अबब.. साडेसात फूट उंचीची टोमॅटो बाग!
By admin | Published: February 7, 2016 10:10 PM2016-02-07T22:10:34+5:302016-02-08T00:48:49+5:30
पळशी शिवार : संभाजी पिसाळ यांच्या कष्टाला फळं; ऊस उत्पादनाकडे कधीच न वळण्याचा निर्धार
असाध्य ते साध्य होईल तयास’ या उक्तीचे अनुकरण करीत वडिलार्जित २० गुंठे क्षेत्रात जिद्द, चिकाटी आणि मेहनतीची बळावर कोरेगाव तालुक्यातील पळशी येथील शेतकरी संभाजी आबाजी पिसाळ यांनी या क्षेत्रात अलंकार या जातीच्या टोमॅटोची लागवड केली. बागेची उत्तम जोपासना केल्याने बागेतील टोमॅटोची उंची साडेसात फूट आहे. कोरेगाव-वाठार रस्त्याकडेला असलेली ही बाग सर्वांच्याच नजरेत बसत आहे.
पळशी येथील सर्वसामान्य शेतकरी कुटंबात जन्मलेल्या संभाजी पिसाळ यांनी घरच्या बेताच्या परिस्थितीमुळे नववीपर्यंतच शिक्षण घेतले. शिक्षण कमी असल्याने नोकरीच्या वाटाही बंद झाल्या होत्या. शेवटी वडिलार्जित शेती करणे हाच त्यांच्या समोरचा मार्ग होता. घरची शेती ही तशी अत्यल्पच असल्याने या शेतीत त्यांनी झोकून घेतले. १९९५ पासून त्यांनी या शेतात टोमॅटोचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली. काळानुरूप शेती व्यवस्थेतील आधुनिकतेचा त्यांनीही स्वीकार करत शेती व्यवसायात बदल घडवला.
या बागेतून त्यांनी १७ टन टोमॅटोचे उत्पन्न घेतले आहे. या माध्यमातून त्यांना २ लाख ७५ हजारांचे उत्पन मिळाले आहे. तर बागेसाठी आजपर्यंत १ लाख ६० हजार रुपये खर्च झाला आहे. हा खर्च वजा करता त्यांना आत्तापर्यंत ८० ते ९० हजारांचा निव्वळ फायदा झाला आहे. अजून किमान २२ ते २५ टन टोमॅटोचे उत्पन्न मिळेल, असा त्यांना विश्वास आहे. हा अंदाज पाहता २० गुंठे टोमॅटो बागेतून त्यांना खर्च वजा जाता अडीच ते तीन लाखांचे उत्पन्न या बागेतून मिळणार आहे. --संजय कदम
मल्चिंग पेपरचा वापर
२४ आॅगस्ट २०१५ रोजी त्यांनी अलंकार नावाच्या टोमॅटोची लागवड केली. लागवड करताना त्यांनी मल्चिंग पेपरचा व ठिबक सिंचनचा वापर केला. यामुळे या रोपांची वाढ चांगली होण्याबरोबरच पाण्याची मोठी बचत झाली. शिवाय तण व बुरशीजन्य रोगापासून रोपांचा बचाव झाला. अधून-मधून शेण खताबरोबरच, सेंद्रिय व रासायनिक खतांचा वापर या बागेसाठी केला. यामुळे बागेची उंची सात ते साडेसात फुटांपर्यंत वाढली. उंची वाढण्याबरोबरच टोमॅटोचे उत्पादनही वाढले आहे.
शेतकऱ्यास हमखास फायदा मिळवायचा असेल तर टोमॅटोसारखे दुसरे कोणतेच पीक फायदेशीर नाही. ऊस पिकाबाबत मला विश्वास वाटत नाही. सध्या उसाचे पीक संकटात आहे. कारखानदाऱ्यांंची, तोडकऱ्यांची मनधरणी करण्यातच शेतकरी खचून जात असल्याने उसाचे पीक मी कधीच घेत नाही, आणि घेणार नाही. यावर्षी मी या टोमॅटो बागेबाबत अभ्यासपूर्वक नियोजन केले होते.
- संभाजी पिसाळ