तब्बल पाच दिवसांनी एक मृतदेह बाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 10:54 PM2017-08-04T22:54:16+5:302017-08-04T22:55:19+5:30
आंबोली : आंबोलीतील कावळेसाद पॉर्इंट येथील खोल दरीत पडलेल्या दोघा युवकांपैकी एका युवकाचा मृतदेह बाहेर काढण्यात सांगेली व आंबोली येथील शोध पथकाला तब्बल पाचव्या दिवशी यश आले आहे. बाहेर काढण्यात आलेला मृतदेह प्रताप अण्णासाहेब उजगरे (२४, रा. हुनगीखुर्द, जि. बीड) याचा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आंबोली : आंबोलीतील कावळेसाद पॉर्इंट येथील खोल दरीत पडलेल्या दोघा युवकांपैकी एका युवकाचा मृतदेह बाहेर काढण्यात सांगेली व आंबोली येथील शोध पथकाला तब्बल पाचव्या दिवशी यश आले आहे. बाहेर काढण्यात आलेला मृतदेह प्रताप अण्णासाहेब उजगरे (२४, रा. हुनगीखुर्द, जि. बीड) याचा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
तर शनिवारी सहाव्या दिवशी एनडीआरएफचे पथक आंबोली येथे येणार असून, ते इम्रान गारदी याचा शोध घेणार आहेत.
सोमवारी सायंकाळी गडहिंग्लज येथील पोल्ट्रीत काम करणारे सातजण आंबोली-कावळेसाद येथे फिरायला आले होते. त्यातील दोघेजण मद्यधुंद अवस्थेत मौजमजा करीत असताना खोल दरीत कोसळले. त्यानंतर चार दिवस कोल्हापूर व आंबोलीसह सांगेली येथील शोध पथके या युवकांचा शोध घेत होती. पण त्यांना यश येत नव्हते.
त्यातच गुरुवारी सायंकाळी कोल्हापूर येथील शोध पथक निघून गेले. त्यानंतर शुक्रवारी सकाळी सांगेली येथील बाबल आल्मेडा व आंबोलीतील किरण नार्वेकर यांनी शोध मोहीम सुरू केली होती.
दुपारी २ च्या सुमारास प्रताप उजगरे याचा मृतदेह खोल दरीच्या पायथ्याला असल्याचा दिसला. त्या मृतदेहापर्यंत किरण नार्वेकर व दाजी माळकर पोहोचले. त्यांनी मृतदेहाला रोपवेच्या साहाय्याने दुपारी ३च्या सुमारास वर काढले.
गडहिंग्लज येथील इम्रान गारदी याच्या मृतदेहाचा शोध घेण्याचा प्रयत्न पथकाने केला. पण दाट धुके तसेच पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने त्यात अनेक अडचणी येत असल्याने ही शोधमोहीम सायंकाळी ४च्या सुमारास थांबविण्यात आली. पुन्हा हे पथक शनिवारी शोध घेणार आहे. दरम्यान, वर काढण्यात आलेल्या प्रताप उजगरे याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
या शोध मोहिमेत बाबल अल्मेडा, किरण नार्वेकर, अभय किनळोस्कर, वामन नार्वेकर, पंढरीनाथ राऊळ, फिलिप अल्मेडा, संतान अल्मेडा, गुरुनाथ सावंत, संतोष नार्वेकर, सचिन नार्वेकर, सुमन राऊळ, बाबूराव कविटकर, अबीर आंचेकर, कृष्णा राऊळ, सुरेश राऊत, शंकर गावडे, अमरेश गावडे, दीपक मेस्त्री, आदी सहभागी झाले होते. तर आंबोली पोलीस हेडकॉन्स्टेबल विश्वास सावंत, कॉ. गुरुदास तेली, प्रकाश कदम, गजानन देसाई, कोलगोंडा आदींनी या पथकाला सहकार्य केले.
कोल्हापूर येथील शोध पथकाबाबत संताप
पाच दिवसानंतर प्रताप याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. या दोघाही युवकांचे मृतदेह मंगळवारीच म्हणजे दुसºया दिवशी काढणे शक्य होते. कोल्हापूर येथील शोध पथकाला कोणीही बोलावले नाही; तरी ते आले. तसेच कोल्हापूरच्या पथकाने सांगेली व आंबोलीतील शोधकार्यात व्यक्तींशी संपर्क ठेवला नसल्यानेच पाच दिवस लागले, अशी तक्रार ग्रामस्थांनी तहसीलदार सतीश कदम यांच्याकडे केली.
प्रतापचे आडनाव राठोड नसून उजगरे
प्रताप हा खोल दरीत पडल्यानंतर त्याची पूर्ण माहिती कोणालाच नव्हती. पोल्ट्रीमालकाने त्याचे नाव प्रताप राठोड असेच पोलिसांना सांगितले होते. पण मृतदेह बाहेर काढल्यानंतर पोलिसांनी प्रतापच्या नातेवाईकांडून संपूर्ण माहिती घेतल्यानंतर आडनाव राठोड नसून, उजगरे असल्याचे सांगितले. त्यामुळे प्रताप हा उजगरे असून राठोड या नावाने सर्वत्र चर्चेत आला होता.