आबलोलीत बारशीला तरुण बनतात वाघ अन्...
By admin | Published: November 26, 2015 09:15 PM2015-11-26T21:15:31+5:302015-11-27T00:14:28+5:30
गुहागर तालुका : ग्रामीण भागात प्राचीन परंपरांचे जतन; बच्चे कंपनीसह तरुणांचाही सहभाग
अमोल पवार ल्ल आबलोली
२१व्या शतकात जग चंद्रावर, मंगळावर पोहोचले असले तरी ग्रामीण भागात आजही आपल्या प्राचीन परंपरांचे जतन केले जात आहे. त्यातीलच एक परंपरेने साजरा होणारा सण म्हणजे वाघबारशी. गुहागर तालुक्यातील आबलोली येथील ग्रामस्थांनी वाघबारशी सण साजरा केला. या सणामध्ये बालदोस्तही सहभागी झाले होते.
दरवर्षी कार्तिक द्वादशीला गावातील शेतकरी-गुराखी बांधव हा उत्सव एकत्रितपणे साजरा करतात. या उत्सवात अबालवृद्धांसह तरुणांचा मोठा सहभाग असतो. कडेकपारीत वसलेले आपले शेतकरी - गुराखी रानावनातून शेती करतात, जनावरे चारतात. अशावेळी त्यांच्या रक्षणाची जबाबदारी जंगलातील जांगलदेवाकडे असते. शेतकऱ्यांकडे असणारी दुभती जनावरे, शेती कामाकरिता लागणारे बैल, रेडे हे चरून झाल्यावर एका विशिष्ट ठिकाणी थांबतात, त्यांच्यामागून फिरणारे गुराखी त्या ठिकाणी विश्रांती घेतात. सोबत आणलेली चटणी-भाकरी खातात. या ठिकाणच्या मोकळ्या मैदानाला गोठण असे म्हणतात. गुरेढोरे निवांतपणे रवंथ करतात. जणूकाही हे सारे जांगलदेवाच्या कृपेनेच सुरळीत सुरु असल्याची त्यांची धारणा असते. म्हणूनच आजच्या दिवशी अशा ठिकाणी गोड खिरीचा नैवेद्य देवाला दाखवला जातो आणि सर्वजण एकत्रितपणे हा खिरीचा नैवेद्य प्रसाद म्हणून भक्ष्यण करतात.
वाघबारशीच्या दिवशी काही तरुणांना शेपटी लावली जाते. अंगावर रंगीबेरंगी पट्टे काढले जातात. मुखवटे परिधान केले जातात आणि प्रतिकात्मक वाघ म्हणून वाडी-वस्ती गावातून पिटाळत गावाबाहेर नेले जाते. त्याच्यावर शेण-मातीचे गोळे फेकले जातात.
गावाबाहेर पिटाळताना वाघरु वाघरु असे ओरडतात. नंतर गावाच्या वेशीजवळ नदीवर सर्वजण आंघोळ करतात. नैवेद्य देवाला दाखवून स्वत: भक्ष्यण करतात. जांगलदेवाला सर्वांच्या रक्षणाचे साकडे घालतात. संध्याकाळी तुलसी विवाह मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
आबलोलीतील या प्रथेला हजारो वर्षांची परंपरा असल्याचे सांगितले जाते आणि ही परंपरा आजही मोठ्या श्रद्धेने गावात जपली जात आहे. विशेष म्हणजे या उत्सवात लहान मुले, तरुण, वयोवृद्ध यांचा सहभाग असतो. त्यामुळे दोन-तीन पिढ्यांच्या एकत्रित समन्वयातून हा उत्सव साजरा होताना दिसतो. काळ कितीही बदलला तरी अजूनही आपले सण-उत्सव, प्रथा परंपरा सहजीवनासाठी नक्कीच पूरक ठरत आहेत.