विहिरीत कोसळलेले गव्याचे पिल्लू स्वतःच आले बाहेर, वनविभागाने सोडला सुटकेचा निःश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 02:34 PM2019-03-27T14:34:05+5:302019-03-27T15:44:56+5:30
एडगाव वायंबोशी येथे गव्याचे पिल्लू विहिरीत आढळून आले आहे.
वैभववाडी(सिंधुदुर्ग): एडगाव वायंबोशी येथे छोट्या विहिरीत पडलेले गव्याचे पिल्लू आपणच बाहेर पडले. लोकांची गर्दी कमी होताच खडकावर चढून बाहेर पडले. त्यानंतर त्याने जंगलात धूम ठोकली. त्यामुळे वनविभागाच्या कर्मचा-यांनी सुटकेचा श्वास सोडला. याबाबत माहिती अशी की, वायंबोशी गुरखेवाडी येथील अवधूत गुरखे यांच्या घरानजीक असलेल्या छोटेखानी विहिरीत सकाळी ११ च्या सुमारास गव्याचे पिल्लू आढळून आले.
त्यानंतर वाडीतील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथील प्रतिष्ठित नागरिक गंगाराम उर्फ बाबू अडुळकर यांनी सरपंच आणि वनविभागाला याबाबत भ्रमणध्वनीद्वारे माहिती दिली. होती त्यामुळेच वन कर्मचारी तातडीने घटनास्थळी निघाले होते.
सुमारे दीड वर्ष वयाचे असलेले गव्याचे छोट्या विहीरीतील गाळातून बाहेर पडण्यासाठी धडपडत होते. मात्र विहिरीभोवती लोकांची गर्दी झाल्यामुळे ते बिथरले होते. सरपंच राजेंद्र सुतार आणि वन कर्मचारी वायंबोशी येथे पोहोचल्याचे कळताच लोकांची विहीरीभोवतालची गर्दी पांगल्याची संधी साधून गव्याचे पिल्लू छोट्या विहीरतून खडकावर चढून बाहेर पडण्यात यशस्वी ठरले. विहीरीतून बाहेर पडताच त्याने जंगलात धूम ठोकली. त्यामुळे वनविभागाने सुटकेचा निःश्वास सोडला.