विविध आजारांवर रामबाण औषध देणारे आबा कडव

By admin | Published: September 17, 2015 10:04 PM2015-09-17T22:04:02+5:302015-09-18T23:38:31+5:30

जिल्ह्यात नावलौकिक : ५५ वर्षे माफक दरात अखंडित सेवा

Aba Kadav, who gave a panic over various diseases | विविध आजारांवर रामबाण औषध देणारे आबा कडव

विविध आजारांवर रामबाण औषध देणारे आबा कडव

Next

दीपक तारी- शिवापूर  --वयाची ७५ वर्षे पूर्ण झालेली. गेली ५५ वर्षे माणगाव खोरे तसेच भारत देशाच्या कानाकोपऱ्यांत वनौषधीच्या माध्यमातून लोकांचे आंतर्बाह्य आजार रामबाण आयुर्वेदिक औषधाने ते बरे करीत आले आहेत. वसोली (ता. कुडाळ) सतयेवाडी येथील वैद्य गोविंद ऊर्फ आबा कृष्णा कडव जिल्ह्यात नावलौकिक मिळवून आहेत.
वैद्यकीय क्षेत्रात आधुनिकता येण्यापूर्वी गावोगावी मनुष्यप्राणी तसेच पाळीव प्राण्यांवर गावोगावी असणारे गावठी वैद्य जंगलातील वनौषधीचा वापर करून रुग्ण तसेच पाळीवर प्राण्यांवर उपचार करून त्यांना दिलासा देण्याचे काम करीत होते.
आपल्या वयाच्या विसाव्या वर्षांपासून गावठी औषधांद्वारे रोगी तसेच पाळीव प्राण्यांच्या आजारांवर आज वयाच्या ७५ वर्षांपर्यंत उपचार करीत असणारे वसोली सतयेवाडीतील वैद्य आबा कडवांनी आजपर्यंत विशेष करून कावीळ, त्वचारोग, सरपटणाऱ्या प्राण्यांपासून दंश, पोटदुखी, खोकला, घशाचे आजार, बाळंतिणीचा पिंड न परतणे यावर औषधोपचार केले. आजपर्यंत त्यांनी कुडाळ, सावंतवाडी तसेच जिल्हा आरोग्य केंद्रात घेतलेल्या आरोग्य शिबिरामध्येही सहभाग घेऊ न विविध आजार व त्यावरील उपचारांची विशेष माहिती घेतली.
अधिक माहिती घेतली असता त्यांनी सांगितले की, महाराष्ट्र शासनाच्या भांगरे नावाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडील वनौषधी आपल्या नाशिक येथे नेऊन लावली. तसेच चिपळुणातील सिव्हील सर्जन यांनीसुद्धा वनौषधी बागेबाबत अधिक माहिती घेतली. वनस्पतींचे नाव सांगितल्यावर वैद्य आबा कडव त्याचा वापर कसा करावा, हे सांगत.
त्यांचे एक वैशिष्ट्य की, ते ही सेवा विनामोबदला करतात. गरजू लोकांच्या उपयोगाला येत असल्याचे पाहून सिव्हिल सर्जनांनी आबांना सांगितले की, तुम्ही गोरगरिबांची सेवा करता ही चांगली गोष्ट आहे. या सेवेमध्ये काय गरज भासल्यास मी तुम्हाला मदत करेन, असे आश्वासन दिले. आजपर्यंत औषधोपचाराने बरे झालेल्या रुग्णांनी प्रसार केल्याने माणगाव खोरे तसेच गुजरात, दिल्ली व देशातील कानाकोपऱ्यांतील लाखो लोकांनी आबांकडून आयुर्वेदिक उपचार घेतले.
परंतु, तुमच्या औषधाने मला बरे वाटले नाही, असा एकही रुग्ण आजपर्यंत सांगायला आला नाही. उलट प्रत्यक्ष भेटून, फोनद्वारे संपर्क साधून आपल्या औषधाने आम्हाला बरे वाटले. आम्हाला तुम्ही देवदूतासारखे भेटलात, असे सांगतात.
आपल्या उपचार पद्धतीबाबत ते सांगतात की, कुडाळ पंचायत समितीतील कर्मचारी भालचंद्र तेंडोलकर यांना चुकीचे इंजेक्शन दिल्याने त्यांना वेंगुर्लेतील रुग्णालय तसेच के.ई.एम.पर्यंत सहा महिने उपचार घेतले. या तरुणाच्या पायापासून नखे तसेच डोक्यापर्यंत रिअ‍ॅक्शनच्या गाठी आल्या होत्या. परंतु, भालचंद्र तेंडोलकर हे आपल्या मित्राच्या साथीने वैद्य आबा कडवांकडे आले.
आबांनी दिलेले एक महिन्याचे आयुर्वेदिक औषध घेतल्याने शरीरावर आलेल्या गाठी नष्ट झाल्या. तसेच वसोली येथील मानकरी, य. रा. परब विद्यालयाचे स्थानिक कमिटी चेअरमन श्रीकृष्ण परब यांच्या लहान बहिणीच्या लिव्हरला सूज आली होती. तिच्यावर आयुर्वेदिक उपचार केल्यावर तिला सातव्या दिवशी गुण पडला. एक वर्षापूर्वी उपवडे येथील संभाजी राणे यांच्या नातीवर बाळंतपणाच्यावेळी नैसर्गिक प्रसूती होत नाही, तेव्हा सिझर करून मुलाला जन्म देण्यात आला. परंतु, काही दिवसांतच तिच्या पोटात पस झाला. शेवटी वैद्य आबा कडवांनी आपल्या गावठी औषधाने तिच्यावर उपचार सुरू केले.
तिलाही आठ दिवसांत गुण पडला. तसेच हळदीचे नेरूरमधील हरिजन वाडीतील एका शेतकऱ्यांची म्हैस आजारी होती. आबा स्वत: त्यांच्या बोलावण्यावर घरी गेले. म्हैशीचे निरीक्षण केल्यावर त्यांनी सांगितले की, भाताचा कोंडा तिच्या घशात अडकला आहे, असे निदान करून म्हैशीला झाडपाल्याचे औषध दिल्यावर ती बरी झाली.
अशा वनौषधी उपचारांबाबत नावलौकिक मिळविलेल्या आबांना वडील कृष्णा गोविंद कडव, काका विष्णू गोविंद कडव, तसेच नारूर येथील वामन वानरमाऱ्याकडून ७० वर्षांपूर्वी वनौषधीची माहिती मिळाली होती. चुलते विष्णू कडव यांच्याकडून त्यांनी दीक्षा घेतली होती.
वसोली वीरवाडी येथे नोकरीला असलेले व सध्या निवृत्तीनंतर आपल्या कुपवडे (ता. कुडाळ) या गावी वनौषधीच्या उपचारामध्ये नावलौकिक मिळविलेले सदानंद शिवा गोसावी गुरुजींकडूनही त्यांना आयुर्वेदिक उपचार पद्धतीबाबत विशेष माहिती मिळाली, असे ते सांगतात.


घराघरांत वेगळे स्थान
आयुर्वेदिक औषधाच्या रूपाने आबा कडव यांनी माणगाव खोऱ्यातील घराघरांत आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. दिलदार व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख आहे. शालेय मुले, शिक्षक, अन्य सरकारी नोकर, एसटीचे वाहक, चालक यांच्याशीही ते अदबीने वागतात. त्यापैकी कोणीही भेटला तरी चहा-पाणी दिल्याशिवाय ते सोडत नाहीत. त्यांच्या घरात स्वत:चे घर समजून येणाऱ्याने आपल्याला हवे ते घ्यावे. तिथे कोणताही भेदभाव केला जात नाही.

धन्वंतरी पुरस्काराची आस
आयुर्वेदिक उपचार पद्धतीने माणगाव खोरे
तसेच दिल्ली, गुजरात, आदी ठिकाणच्या
रोग्यांवर उपचार करून त्यांचे आजार जणू बरे करणारे, जणू त्यांच्यासाठी देवदूत बनलेल्या वसोली सतयेवाडी येथील जनमानसात आबा कडव यांनी आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. शासनानेही अशा दुर्लक्षित वैद्यांची माहिती घेऊन त्यांना धन्वंतरी पुरस्कार देऊन गौरव केल्यास मोठा सन्मान केल्यासारखे होईल.

Web Title: Aba Kadav, who gave a panic over various diseases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.