सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३३,२३९ लाभार्थींचे 'आभा कार्ड' काढणार - आरोग्य अधिकारी धुरी
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: September 2, 2023 12:41 PM2023-09-02T12:41:11+5:302023-09-02T12:41:35+5:30
आतापर्यंत ९२ हजार आभा कार्ड काढण्यात आले
सिंधुदुर्ग : केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी आयुष्मान भव मोहीम जिल्ह्यात १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत आयुष्मान आपल्या दारी, आयुष्मान सभा, आयुष्मान मेळावा आणि शालेय मुलांची तपासणी आदी उप्रकम राबविले जाणार आहेत. तसेच या मोहिमेत पात्र असलेल्या ३३,२३९ लाभार्थींचे आयुष्मान भारत कार्ड काढले जाणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या दालनात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संदेश कांबळे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. रमेश कर्तस्कर, आयुष्मान भारत योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. प्रवीण गोरोले आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. सई धुरी म्हणाल्या की, केंद्र शासनाच्या वतीने आयुष्मान भारत योजना राबविली जात आहे. तसेच १ सप्टेंबर २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत आयुष्मान भव ही महत्त्वाकांक्षी मोहीम जिल्ह्यात राबविली जात आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. यात आयुष्मान आपल्या दारी ३.० अंतर्गत पात्र लाभार्थींची नोंदणी करून आयुष्मान कार्डचे वाटप केले जाणार आहे. आयुष्मान सभाअंतर्गत गावपातळीवर आयुष्मान भारत आणि आभा कार्डबाबत जनजागृती करणे, कार्ड काढणे, पात्र लाभार्थींची यादी प्रसिद्ध करणे आदी विषयांवर जनजागृती करण्यात येणार आहे.
आयुष्मान मेळाव्याअंतर्गत या कालावधीत आरोग्यवर्धिनी केंद्रावर दर आठवड्यातील शनिवारी व रविवारी आरोग्य विषय विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच या मोहिमेत अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील मुलांची आरोग्य तपासणी केली जाणार असल्याची माहिती डॉ. धुरी यांनी दिली.
आतापर्यंत ९२ हजार आभा कार्ड
१ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२३ या आयुष्मान भव मोहीम कालावधीत ज्या लाभार्थींनी अद्याप आभा कार्ड काढले नाही अशांचे आभा कार्ड काढले जाणार आहे. आतापर्यंत ९२ हजार आभा कार्ड काढण्यात आले आहेत. मात्र, अद्यापही ३३२३९ पात्र लाभार्थींचे आभा कार्ड काढले नाही. त्यामुळे या मोहिमेत या पात्र लाभार्थींचे आभा कार्ड काढण्यात येणार आहे.