सिंधुदुर्गच्या 'अभया'ला टचिंग ऑन कास्ट या संशोधनासाठी इंग्लंडमधील आर्ट कौन्सिलकडून ३१ लाखांचा पुरस्कार
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: February 24, 2024 04:19 PM2024-02-24T16:19:00+5:302024-02-24T16:19:00+5:30
सिंधुदुर्ग : मुळ सिंधुदुर्गनगरी येथील निवासी असलेल्या आणि सध्या इंग्लंडमध्ये अल्पावधीतच '' कंन्टेम्पररी आर्टिस्ट '' म्हणून नावलौकिक मिळविलेल्या 'स्त्रीवादी ...
सिंधुदुर्ग : मुळ सिंधुदुर्गनगरी येथील निवासी असलेल्या आणि सध्या इंग्लंडमध्ये अल्पावधीतच '' कंन्टेम्पररी आर्टिस्ट '' म्हणून नावलौकिक मिळविलेल्या 'स्त्रीवादी दलित क्यूअर आर्टिस्ट' अभया पुरुषोत्तम रजनी यांना इंग्लंड येथील आर्ट कौन्सिल कडून ' टचिंग ऑन कास्ट ' (जातीला स्पर्श करण्यासाठी) या संशोधन प्रकल्पाला ४० हजार पौंडाचा (इंडियन करन्सी मध्ये ३१ लाख रुपयांचा) पुरस्कार देण्यात आला आहे.
युनायटेड किंगडम मधील शेफिल्ड शहरातील ब्लॉक प्रोजेक्ट्स या प्रख्यात आर्ट गॅलरीत २९ जानेवारी २०२४ पासून अभया यांच्या रिसर्च रेसिडेंन्सीने सुरु केला आहे. या संशोधन प्रोजेक्ट्सच्या प्रमुख संशोधक अभया रजनी पुरुषोत्तम या आहेत. या संशोधन प्रकल्पाचे प्रदर्शन ब्लॉक प्रोजेक्ट्स गॅलरीत प्रेक्षकांसाठी सादर करण्यात येईल.
अभयाच्या रिसर्च रेसिडेन्सी मध्ये चालू असलेल्या संशोधनादरम्यान आजीच्या गोधडीच्या इतिहासाची चिकित्सात्मक उलगड त्यांच्या गोधडीमय इंस्टॉलेशनमधून चालू आहे. या प्रकियेचा पहिला भाग लंडन येथील प्रख्यात आर्ट गॅलरी आणि स्टुडिओज गॅसवर्कस येथे जूलै-ऑगस्ट २०२३ मध्ये निर्माण करण्यात आला. तर दुसरा भाग ब्लॉक प्रोजेक्ट्स मध्ये झाला . तिसरा भाग लंडनमध्ये सध्या चालू आहे. शेफिल्ड येथील ब्लॉक प्रोजेक्ट्स अभया यांनी स्वतःच्या वैयक्तिक संशोधनाबरोबरच लंडन येथील दलित समाजातील इकॉनॉमिक्स अॅण्ड सोशल रिसर्च कौन्सिल स्काॅलर रितू कोचर या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये पी. एच.डी.करत आहेत. त्यांनाही या प्रोजेक्ट्समध्ये अभयाच्या सहयोगी म्हणून निमंत्रित करण्यात आले होते.
अभयाची आर्ट प्रॅक्टिस ही जाती व्यवस्थेला, पितृसताक समाजावर आधारित हेट्रोनॉमिटीविटी आणि जातीयवादी शिक्षण व्यवस्थेला प्रश्न विचारून नवीन अँटी-कास्ट विचाराच्या शिबिराच्या शोधावर आधारित आहे. त्यांची प्रॅक्टिसही जातीशी निगडीत असलेल्या कलाकुसरीवर जसे गोधडी, आयदान, विणकाम याचबरोबर स्त्रियांवर सोपविण्यात येणाऱ्या कामांमधून जसे जेवण बनविणे, मसाले बनविणे या प्रकियेमधून दलित क्यूअर स्त्रीवादी विचार कसा निर्माण केला जाईल. जो विचार बुध्दी बरोबर शरीर आणि भावनिक प्रगल्भतेवर आधारित असेल. अशा संशोधनावर अभयाची प्रॅक्टिस उभारलेली आहे. सिंधुदुर्गकन्या अभया पुरुषोत्तम रजनी यांच्या या कर्तृत्वाबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्यात कौतुक होत आहे.