बांधकाम सभापतीपदी अभिजीत मुसळे

By admin | Published: August 26, 2016 10:10 PM2016-08-26T22:10:48+5:302016-08-26T23:15:52+5:30

प्रज्ञा खोत यांची अनुपस्थिती : दोन सभापतीपदे रिक्तच, कणकवली नगरपंचायतीची विशेष सभा

Abhijeet Mussale as Chairman of Construction | बांधकाम सभापतीपदी अभिजीत मुसळे

बांधकाम सभापतीपदी अभिजीत मुसळे

Next

कणकवली : येथील नगरपंचायतीच्या विषय समिती सभापती निवडीसाठी आयोजित केलेल्या विशेष सभेस माजी नगराध्यक्षा अ‍ॅड. प्रज्ञा खोत अनुपस्थित राहिल्याने महिला व बालकल्याण समिती तसेच आरोग्य समिती सभापतीपदाची निवड होऊ शकली नाही. तर बांधकाम सभापती पदासाठी काँग्रेसच्या अभिजीत मुसळे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे बांधकाम सभापती म्हणून अभिजीत मुसळे यांची निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केले.
अभिजीत मुसळे यांच्या निवडीमुळे पारकर गटाच्या ताब्यात असलेले बांधकाम सभापतीपद काँग्रेसच्या ताब्यात गेले आहे. कणकवली नगरपंचायत विषय समिती सभापती निवडीसाठी शुक्रवारी प. पू. भालचंद्र महाराज सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी संतोष भिसे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा झाली. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी अवधुत तावडे यांच्यासह १६ नगरसेवक व २ स्वीकृत नगरसेवक उपस्थित होते.
तत्पूर्वी विषय समिती सभापती निवड कार्यक्रमानुसार सकाळी १0 वाजता प्रक्रिया सुरु होताच नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याच्या वेळेत काँग्रेसच्यावतीने बांधकाम समिती सभापती पदासाठी अभिजित मुसळे यांनी पीठासिन अधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल केला. यावर सूचक म्हणून किशोर राणे तर अनुमोदक म्हणून गौतम खुडकर यांची नावे होती. दुपारी १२.३0 वाजण्याच्या सुमारास अर्जाची छाननी करून तो वैध असल्याचे संतोष भिसे यांनी जाहीर केले.
निर्धारित वेळेत अर्ज मागे न घेतल्याने तसेच बांधकाम सभापती पदासाठी मुसळे यांचा एकमेव अर्ज आल्याने सभापती म्हणून त्यांची निवड झाल्याचे घोषित करण्यात आले.
तसेच प्रशासनाच्यावतीने अभिजीत मुसळे व पाणी पुरवठा समिती सभापतीपदी पदसिध्द असलेल्या उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर यांची निवड झाल्याबद्दल पुष्पगुच्छ देवून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
मंगळवारी विषय समिती सदस्यांची निवड करण्यासाठी आयोजित सभेत अ‍ॅड. प्रज्ञा खोत अनुपस्थित असताना सादर केलेल्या पत्रावर त्यांची बनावट सही आपण मारल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. त्याबाबत खुलासा करावा, अशी मागणी राधाकृष्ण नार्वेकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी संतोष भिसे यांच्याकडे केली.
मात्र, याबाबत खुलासा करण्याचा प्रश्नच येत नाही. कारण आपल्याकडे त्याबाबत मी स्पष्टीकरणच मागितलेले नाही. असे सांगत संतोष भिसे यांनी नार्वेकर यांची मागणी फेटाळून लावली. तर गणेश हर्णे यांनी सभा ज्या विषयासाठी आयोजित केली आहे. त्याचविषयावर चर्चा व्हावी असे सांगितले. या विषयावरुन सत्ताधारी व विरोधकात काही वेळ गरमागरमी झाली.
बांधकाम सभापतीपदी अभिजीत मुसळे यांची निवड जाहीर झाल्यावर नगरपंचायत कार्यालयाबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष केला. तसेच बांधकाम सभापतींच्या दालनात काँग्रेस नेते नारायण राणे यांची (फोटो) प्रतिमा पुन्हा लावण्यात आली. नगरपंचायतीत पारकर गटाने सत्ता मिळविल्यानंतर हे फोटो काढण्यात आले होते. (प्रतिनिधी)


समिती सदस्य आहेत परंतु दोन समित्यांमध्ये सभापती नाही
महिला व बालकल्याण समिती सदस्य म्हणून नगरसेविका सुविधा साटम, अ‍ॅड. प्रज्ञा खोत, सुमेधा अंधारी, नंदिनी धुमाळे तर आरोग्य समितीचे सदस्य म्हणून किशोर राणे, मेघा गांगण, प्रज्ञा खोत, राधाकृष्ण नार्वेकर, सुशांत नाईक यांची निवड मंगळवारी झाली होती. मात्र, या दोन्ही समित्यांमध्ये सदस्य असलेल्या प्रज्ञा खोत शुक्रवारी अनुपस्थित राहिल्याने सभापती पदासाठी सत्ताधारी गटाकडून कोणीही अर्ज दाखल करु शकले नाही. त्यामुळे नगरपंचायतीत दोन समित्यांचे सदस्य आहेत पण सभापती नाहीत अशी स्थिती निर्माण झाली आहे.

काहीजण सत्तेसाठी हपापलेले ! : धुमाळे
सभापतीपदाच्या निवडणुकीत काहीजण सत्तेसाठी हपापलेले असल्याचे दिसून आले. मागील निवडणुकीच्यावेळी नगराध्यक्ष निवडीला विरोध करणारे आता बांधकाम सभापतीपद घेऊन सत्तेत कसे सहभागी झाले? असा प्रश्न उपस्थित करतानाच प्रज्ञा खोत या एक जबाबदार नागरिक आहेत. त्यांनी नगराध्यक्षपद भूषविले आहे. असे असतानाही त्यांच्या अनुपस्थितीमुळे दोन सभापतीपदे रिक्त राहिली आहेत. हे योग्य नव्हे. त्यामुळे या समितीअंतर्गत अनेक कामे प्रलंबित राहणार आहेत. शहर विकासासाठीच आम्ही पारकर गटाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे चांगल्या कामाला आमचा पाठिंबा राहील, असे नगरपंचायतीच्या विरोधी गटनेत्या राजश्री धुमाळे, सुशांत नाईक यांनी यावेळी सांगितले. यावेळी नगरसेविका स्नेहा नाईक, नंदिनी धुमाळे आदी उपस्थित होत्या.

त्याचवेळी सभापतीपद का घेतले नाही : पारकर
मागील नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी नगराध्यक्ष म्हणून माधुरी गायकवाड व उपनगराध्यक्ष म्हणून कन्हैया पारकर यांना संधी द्यावी, तसेच सभापतीपदे नलावडे गटातील सदस्यांनी घ्यावी, अशीच आमची भूमिका होती. मात्र, त्यावेळी काँग्रेस नेत्यांना का गुमराह करण्यात आले ? जर त्यावेळीच आमच्या भूमिकेप्रमाणे झाले असते. तर आता निर्माण झालेले प्रश्नच उपस्थित झाले नसते. त्याचवेळी सभापती पद का घेतले नाही ? असा प्रश्न उपस्थित करतानाच आमच्या भूमिकेशी निगडीत राहून सभापती निवड झाली असल्याचे कन्हैया पारकर म्हणाले. अ‍ॅड. प्रज्ञा खोत या आपल्या कौटुंबिक अडचणीमुळे या सभेला उपस्थित राहिलेल्या नाहीत. विरोधक म्हणतात त्याप्रमाणे त्या जर आमच्या कारभाराला कंटाळल्या असतील तर त्या त्यांच्या गटाबरोबर गेल्या असत्या. मात्र, तसे झालेले नाही.


नगरपंचायत कारभारावर वचक ठेवणार : मुसळे
काँग्रेस नेते नारायण राणे, आमदार नीतेश राणे यांचे नेतृत्व तसेच मार्गदर्शनाखाली आम्ही काम करीत आहोत. नगरपंचायतीत आता आमची सत्ता नसली तरी बांधकाम सभापतींच्या माध्यमातून नगरपंचायतीच्या कारभारावर आम्ही वचक ठेवणार आहोत. महिला व बालकल्याण, आरोग्य समिती सभापतीपदासाठी सत्ताधाऱ्यांनी आमच्याकडे सहकार्य मागितलेले नाही. त्यांचा तसा प्रस्ताव आला असता तर निश्चितच आम्ही विचार केला असता. अशी भूमिका माजी उपनगराध्यक्ष समीर नलावडे व काँग्रेस नगरसेवकांनी निवडीनंतर मांडली. शहर विकास व आरोग्य सारख्या सुविधा नागरिकांना देतानाच कोणी काही गैर करत असेल तर त्यांना आम्ही रोखणार आहोत. प्रज्ञा खोत अनुपस्थित राहिल्याने दोन समित्यांच्या सभापतींची निवड होऊ शकली नाही. हे लज्जास्पद आहे.

Web Title: Abhijeet Mussale as Chairman of Construction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.