अबिद नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे क्रियाशील सदस्यच नाहीत, अमित सामंत यांचा गौप्यस्फोट
By सुधीर राणे | Published: July 8, 2023 04:56 PM2023-07-08T16:56:04+5:302023-07-08T16:56:22+5:30
कुडाळ: प्रतिज्ञापत्रे भरूनही काही जण पदाच्या अभिलाषेने दुसरीकडे गेले असले तरी पक्षात काही फुट पडणार नसुन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९० ...
कुडाळ: प्रतिज्ञापत्रे भरूनही काही जण पदाच्या अभिलाषेने दुसरीकडे गेले असले तरी पक्षात काही फुट पडणार नसुन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९० टक्के राष्ट्रवादी कार्यकर्ते पक्षप्रमुख शरद पवारां सोबतच आहेत असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेससिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष अमित सामंत यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त करीत अबिद नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे क्रियाशील सदस्यच नव्हते, असा गौप्यस्फोट केला.
राष्ट्रवादीच्यावतीने जिल्हा कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अमित सामंत, माजी कार्याध्यक्ष प्रसाद रेगे, तालुकाध्यक्ष शिवाजी घोगळे, जिल्हा सचिव भास्कर परब, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष बाळ कनयाळकर, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष सचिन पाटकर, युवती जिल्हाध्यक्ष सावली पाटकर तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.
अमित सामंत म्हणाले, पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या पाठीशी जिल्हा खंबीरपणे उभा होता आणि भविष्यातही राहील. ते जी दिशा दाखवतील त्यावर राजकारण चालेल. प्रतिज्ञापत्र भरलेले काहीजण अजित पवार यांच्याकडे गेले. याबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कारवाईचे आधीच संकेत दिले होते. ज्या सात जणांची हकालपट्टी करण्यात आली त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे जाऊन दाद मागावी. हकालपट्टी केलेली कारवाई चुकीची आहे हे त्यांनी पटवून द्यावे, असेही ते म्हणाले.
अजित पवार यांच्याशी भेटलेले ५४ कार्यकर्ते असल्याची चर्चा सुरू आहे. परंतु, प्रत्यक्षात ७ जण क्रियाशील सदस्य आणि पदाधिकारी अजित पवार यांना भेटले. बाकीचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नव्हते. जे सदस्य अधिकृत पदाधिकारी आहेत त्यांची जिल्ह्यातील संघटनेत नोंद आहे. अबिद नाईक हे राष्ट्रवादीचे क्रियाशील सदस्यच नव्हते, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला. आमच्या पक्षात फूट नसून हा छोटासा कपचा उडाला आहे असेही ते म्हणाले.
यंत्रणेच्या दबावामुळे बगावत!
पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी यंत्रणेच्या दबावाखाली येत पक्षाशी बगावत केली हे निषेधार्थ आहे. आम्हाला जास्त यावर बोलायचे नाही आमची भूमिका सर्व समावेशक आहे. असे प्रसाद रेगे म्हणाले.