जिल्ह्यात नवरात्रौत्सवाची लगबग
By admin | Published: September 23, 2016 11:05 PM2016-09-23T23:05:02+5:302016-09-23T23:05:02+5:30
सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
सुनील गोवेकर ल्ल आरोंदा
गणेश चतुर्थीचा उत्सव आता संपतो न संपतो तोच जिल्ह्याला नवरात्रौत्सवाचे वेध लागले आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्यात दांडिया, गरबा या नृत्यांसह भजने, डबलबारी यांच्या तयारीची लगबग पाहावयास मिळत आहे. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या नवरात्रौत्सवातही गावागावांत सांस्कृतिक कार्यक्रमांची धूम पाहावयास मिळणार आहे. या काळात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील नवरात्रौसव मंडळे कार्यरत झाली असून, स्थानिक कलाकारांना नव्याने व्यासपीठ मिळणार आहे.
गणेश चतुर्थीचा सण जवळपास संपलेला असून, नऊ दिवसांची सांस्कृतिक मांदियाळी असलेला नवरात्रौसव आता सुरू होणार आहे. दांडिया ग्रुप, डबलबारी करणारे भजनी बुवा, भजनी मंडळे, दशावतार, गाण्याचे कार्यक्रम करणारे विविध वाद्यवृंद, आॅर्केस्ट्रा, नृत्यात निपुण असणारे कलाकार अशा सर्वच कलाकारांना हक्काचे व्यासपीठ निर्माण होणार आहे. जिल्ह्यातील विविध शहरी भागांबरोबरच आता ग्रामीण भागातूनही गेल्या काही वर्षांत नवरात्रौसव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. देवींच्या मंदिरातून नवरात्रौसव साजरा करण्याची परंपरा आधीपासूनच असली, तरी दांडिया व इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन मोठ्या उत्साहात सादर करण्याची परंपरा अलीकडील काही वर्षांपासूनच सुरू झाल्याचे दिसून येत आहे. या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये नवरात्रौत्सव उत्सवातील नऊ रात्री जागणार आहेत.
दांडिया, गरबा नृत्य हे मुळात गुजरातचे असले, तरी हे नृत्य तरुण वर्गाला भुरळ पाडणारे असल्याने गावागावांतून दांडिया ग्रुप निर्माण होत आहेत. गावागावांतील नवरात्रौत्सव मंडळांमार्फत दांडिया स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. त्यामुळे चांगले नृत्य सादर करणाऱ्या ग्रुपसाठी आर्थिक फायदा होत असल्याने स्पर्धेत टिकण्यासाठी दांडिया ग्रुप आतापासूनच सरावात गुंतलेले आहेत. तरुणाईसाठी दांडिया हा प्रकार आकर्षण असल्याने तरुण, तरुणी या नृत्य प्रकाराकडे वळत आहेत.
डबलबारीचे खास आकर्षण
जिल्ह्यात भजन, दशावतार या कलांना अच्छे दिन असून, नवरात्रौत्सवामध्येही या कलाकारांची चलती असणार आहे. भजन मंडळांसाठी नऊ दिवसांत विविध ठिकाणी कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध असणार आहे. तर नवरात्रौत्सव मंडळाच्या माध्यमातून दशावतारी नाट्यमंडळांनाही कलेसाठी व्यासपीठ निर्माण होणार आहे.
संगीत भजनाच्या डबलबाऱ्यांंचे आयोजन नवरात्रौत्सव कालावधीत केले जाते. आजही प्रेक्षकांसाठी भजनी बाऱ्यांचे आयोजन हे खास आकर्षण ठरत आले आहे. जिल्ह्यातील नामवंत बुवांच्या डबलबाऱ्यांचे आयोजन तसेच तिरंगी भजनांचे सामने रंगणार आहेत. अतिशय लोकप्रिय असणाऱ्या या प्रकाराला प्रेक्षकांची आजही पहिली पसंती असल्याचे दिसून येते.