फरार आरोपीस मुंबईतून अटक - : शेतकऱ्यांना कोट्यवधीचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 04:53 PM2019-11-22T16:53:23+5:302019-11-22T16:53:35+5:30
गेले वर्षभर पोलीस व शेतकरी त्याचा शोध घेत होते. मात्र विजय कुटुंबासमवेत आपली राहण्याची ठिकाणे बदलत होता. शेतकºयांना तो मुंबईत राहत असल्याचे समजताच विश्वनाथ धुरी यांच्यासह शेतकºयांनी वेंगुर्ला न्यायालयाच्या वॉरंटनुसार कळवा पोलीस ठाण्यात धाव घेऊन येथील पोलिसांच्या मदतीने विजय ज्या कांदिवली येथील एका चाळीमध्ये राहत होता
वेंगुर्ला : सुरंगी कळ्यांचा व्यापार करताना शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांना गंडा घालून फरार असलेला वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा येथील व्यापारी विजय अनंत गोडकर याला सव्वा वर्षानंतर शेतकºयांच्या सहकार्यामुळे मुंबई कळवा पोलिसांनी अखेर अटक केली. त्याला गुरुवारी वेंगुर्ला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने गोडकर याला २ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे.
असोली, सोन्सुरे, आरवली, टाक, जोसोली आदी भागात मोठ्या प्रमाणात सुरंगी कळ्यांचे उत्पादन घेतले जाते. शेतकरी उत्पादित करीत असलेले हे सुरंगीचे कळे विजय गोडकर ठरलेल्या दराप्रमाणे विकत घेऊन अत्तर बनविणाºया कंपन्यांना पाठवित असे. हा व्यवसाय करताना त्याने अनेक शेतक-यांचे सुरंगीचे कळे घेऊन त्यांचे पूर्ण पैसे त्यांना दिले नाहीत. कालांतराने त्याने शेतकºयांना दिलेले बँकेचे चेकही बाऊन्स झाले.
याबाबत शेतकरी त्याच्याकडे पैशाची मागणी करू लागताच २०१८ मध्ये त्याने सर्व शेतकºयांना सुमारे दहा कोटी रुपयांना गंडा घालून शिरोडा गावातून पत्नी व मुलांना घेऊन पळ काढला. त्यामुळे संतप्त शेतक-यांनी वेंगुर्ला पोलीस ठाण्यात व वेंगुर्ला न्यायालयात तक्रारी दाखल केल्या होत्या. न्यायालयाने त्याच्या अटकेचा वॉरंट बजावला होता.
गेले वर्षभर पोलीस व शेतकरी त्याचा शोध घेत होते. मात्र विजय कुटुंबासमवेत आपली राहण्याची ठिकाणे बदलत होता. शेतकºयांना तो मुंबईत राहत असल्याचे समजताच विश्वनाथ धुरी यांच्यासह शेतक-यांनी वेंगुर्ला न्यायालयाच्या वॉरंटनुसार कळवा पोलीस ठाण्यात धाव घेऊन येथील पोलिसांच्या मदतीने विजय ज्या कांदिवली येथील एका चाळीमध्ये राहत होता तेथे सापळा रचून त्याला मंगळवारी रात्री दीडच्या सुमारास ताब्यात घेतले. तेथे तो पत्नी व मुलांसमवेत राहत होता. त्याला कळवा पोलीस ठाण्याचे पोलीस व्ही. एस. कदम व व्ही. एस. पवार यांनी न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी दिली.