फरार आरोपी जेरबंद
By admin | Published: December 5, 2015 11:26 PM2015-12-05T23:26:13+5:302015-12-05T23:31:26+5:30
कोल्हापूर पोलिसांची कारवाई : पोलिसांनी सोडला नि:श्वास
कणकवली : पोलिसांच्या हलगर्जीपणाचा फायदा घेत येथील पोलीस कोठडीतून पळालेला आरोपी नीलेश रामनाथ कोरगावकर (वय ४०, मूळ गाव कागल, जि. कोल्हापूर, सध्या रा. धारगड, पेडणे-गोवा) याला कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने पकडले. शनिवारी सकाळी अकरा वाजता ही कारवाई करण्यात आली. त्याला कणकवली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. फरार आरोपी सापडल्याने कणकवली पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
मंदिरातील फंडपेटी चोरीप्रकरणी नीलेश कोरगावकर याला कणकवली येथे पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. बंदोबस्तावरील पोलीस कोठडीला कुलूप न लावताच झोपी गेल्यामुळे नीलेश गुरुवारी पहाटे पळून गेला होता. कोठडीतून बाहेर पडल्यानंतर नीलेश वागदेच्या दिशेने गेला. तेथे एका दुधाच्या टेम्पोत बसून तो कोल्हापूर येथे ताराराणी चौकात उतरला. सकाळी तो राजाराम तलाव परिसरात फिरत होता.
दरम्यान, नीलेश पसार झाल्याची माहिती गोवा आणि कोल्हापूर पोलिसांना देण्यात आली होती. कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाला राजाराम तलावाच्या परिसरात तो सापडला. त्याला जेरबंद करून कणकवली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. सहायक पोलीस निरीक्षक गीताराम शेवाळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक रविकांत अडुळकर, कृष्णा केसरकर यांनी नीलेशला ताब्यात घेतले. (प्रतिनिधी)