शहर विकासाची आस्था नसलेलेच सभेला अनुपस्थित
By admin | Published: May 2, 2016 11:36 PM2016-05-02T23:36:46+5:302016-05-03T00:50:43+5:30
नगराध्यक्षा, उपनगराध्यक्षांचा टोला : कणकवली नगरपंचायत विशेष सभा
कणकवली: शहरातील बाजारपेठेसह अन्य काही मॉडेल रस्त्यांच्या कामांच्या निविदांना नगरपंचायतीच्या विशेष सभेत मंजुरी द्यायची होती. मात्र, विरोधासाठी केवळ विरोध करणारे काही नगरसेवक गलिच्छ राजकारण करीत या विशेष सभेला अनुपस्थित राहिले. त्यामुळे कोरम अभावी ही सभा होऊ शकली नाही. परिणामी शहरवासियांना चांगल्या रस्त्यांपासून आता वंचित रहावे लागणार आहे. नगरपंचायत कार्यालयात उपस्थित राहूनही सभागृहात सभेला न येवून या नगरसेवकांनी जनतेचा अपमान केला आहे. शहरविकासाबाबत त्यांना आस्था नसल्यानेच त्यांच्याकडून हे कृत्य घडले असल्याची टीका नगराध्यक्षा माधुरी गायकवाड व उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर यांनी येथे केली.
कणकवली नगरपंचायतीची विशेष सभा सोमवारी ११.३० वाजता नगराध्यक्षा माधुरी गायकवाड़ यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. उपनगराध्यक्ष कन्हैैया पारकर, मुख्याधिकारी अवधूत तावड़े, बांधकाम समिति सभापती रूपेश नार्वेकर, विरोधी पक्ष गटनेत्या राजश्री धुमाळे, सुशांत नाईक, नंदिनी धुमाळे, स्नेहा नाईक, सुमेधा अंधारी यांच्यासह नगरपंचायत कर्मचारी उपस्थित होते. मात्र, १२.३0 वाजत आले तरी माजी उपनगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासह अन्य नगरसेवक सभागृहाकडे फिरकलेच नाहीत. यातील अनेक नगरसेवक नगरपंचायत कार्यालयात उपस्थित असूनही सभेला अनुपस्थित राहिले.
त्यामुळे कोरम अभावी सभा तहकूब केल्यानंतर नगराध्यक्षा तसेच उपनगराध्यक्षानी इतर नगरसेवकांच्या उपस्थितीत नगराध्यक्षांच्या दालनात पत्रकार परिषद घेतली. तसेच सभेला अनुपस्थित राहिलेल्या नगरसेवकांच्या या कृतीचा त्यांनी निषेध केला.
यावेळी नगराध्यक्षा तसेच उपनगराध्यक्ष म्हणाले, शहरातील मॉडेल रस्ते म्हणून आगामी काळात नावारुपाला येणाऱ्या रस्त्यांच्या निविदांचे काम तांत्रिक अडचणीमुळे प्रलंबित राहिले होते. या कामाच्या निविदा पुन्हा काढाव्या लागल्या आहेत.
या निविदांसह पर्यटन महोत्सवाच्या १० लाखांच्या कामाच्या निविदांनाही चर्चा करून मंजुरी द्यायची होती. तसेच पोयेकरवाड़ी ते रेल्वे स्थानक परिसर ड्रेनेज सिस्टिमचे काम याचाही या निविदेत समावेश होता. मात्र, यापूर्वी सत्ता उपभोगलेल्या नगरसेवकांनी विशेष सभेला अनुपस्थिति दर्शविली. त्यामुळे शहरातील महत्वाच्या रस्त्यांच्या कामांसह इतर विकासकामे आता रखड़णार आहेत. याला सर्वस्वी जबाबदार सभेला अनुपस्थित राहिलेले नगरसेवक आहेत. लपाछपीचा खेळ करून जनतेला सुविधांपासून वंचित ठेवण्याचा हा डाव आहे. अशा राजकारणामुळेच चांगली माणसे राजकारणात यायला घाबरतात.
पर्यटन महोत्सवाच्या निधीला जर या नगरसेवकाना विरोध करायचा होता तर तो त्यांना सभागृहात लोकशाही मार्गाने करता आला असता. माजी नगराध्यक्षा त्यांच्या पूर्व नियोजित कामामुळे या सभेला अनुपस्थित होत्या. मात्र, इतर नगरसेवकांनी सभेला अनुपस्थित राहून विकासकामामध्ये खोडा घालणे योग्य नाही.
पर्यटन महोत्सव जनतेचा असून त्यांना तो हवा असल्यानेच विविध कार्यक्रमात नागरिकांचा सहभाग वाढत आहे. त्यामुळे जनतेच्या विरोधात कोणीही जाऊ नये. तसेच जनतेला महोत्सवापासून लांब करण्याचा प्रयत्न ही करु नये. महोत्सव हा होणारच असून जनहितासाठी त्यामध्ये सहभागी व्हा, असे आवहनही त्यांनी यावेळी इतर नगरसेवकांना केले.(वार्ताहर)
पर्यटन महोत्सव होणारच !
हा पर्यटन महोत्सव कणकवलीवासीयांचा आहे. त्यामुळे त्यामध्ये कोणीही अडथळा आणण्याचा प्रयत्न केला तरी हा महोत्सव होणारच आहे. नगरपंचायत फंडातून निधी जरी उपलब्ध होऊ शकला नाही तरी ही लोकसहभागातून भव्य दिव्य असा महोत्सव केला जाईल. त्यामुळे विरोध करणाऱ्यांनी घाणेरडी राजकीय खेळी करु नये. स्पर्धाच करायची तर विकासात्मक करावी, असे कन्हैया पारकर यावेळी म्हणाले.
अनुपस्थितीचे कारण जनतेला सांगा !
पूर्वी सुरु असलेला पर्यटन महोत्सव आतापर्यंत सुरु राहिला असता तर त्याला एक भव्य स्वरूप मिळाले असते. तसेच निधीची कमतरताही भासली नसती. मात्र, तत्कालीन सत्ताधाऱ्यांना हे जमले नाही. हे त्यांचे अपयश आहे. त्यांच्या काळात अंतर्गत गटबाजी मुळे खोळंबलेली विकास कामे मार्गी लागावित यासाठीच नगराध्यक्ष निवडीच्यावेळी आम्ही पारकर गटाला पाठिंबा दिला. त्यातून जनहितच साधले गेले आहे. पालकमंत्र्यानी नगरोत्थानमधून ५ कोटी ६९ लाख रुपयांचा निधी शहरासाठी दिला आहे. गेल्या सहा महिन्यात अनेक विकास कामेही झाली आहेत. मात्र, राजकारण करत या विकासाला अडथळा निर्माण करण्याचे काम काँग्रेसच्या काही नगरसेवकांकडून केले जात आहे. जनतेच्या कामांबाबत खरेच त्यांना आस्था असेल तर विशेष सभेला अनुपस्थित राहण्याचे खरे कारण त्यांनी जनतेला सांगावे, असे आव्हान राजश्री धुमाळे व सुशांत नाईक यांनी यावेळी दिले.