अत्यावश्यक आरोग्य सेवेचा गैरवापर

By Admin | Published: November 10, 2015 09:20 PM2015-11-10T21:20:46+5:302015-11-11T00:14:41+5:30

कटू सत्य : सधन रूग्णांकडून मोफत रूग्णवाहिकेसाठी वेगळीच क्लुप्ती

Abuse of essential health care services | अत्यावश्यक आरोग्य सेवेचा गैरवापर

अत्यावश्यक आरोग्य सेवेचा गैरवापर

googlenewsNext

राजेंद्र यादव -- रत्नागिरी -जिल्हा शासकीय रूग्णालयात दीड वर्षापूर्वी सुरू झालेल्या १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने आतापर्यंत जिल्हाभरामध्ये हजारो रुग्णांचे प्राण वाचविले आहेत. मात्र, त्या अत्यावश्यक सेवेचा गैरवापर केला जात असल्याचे दिसत आहे. खासगी रुग्णालयातून केवळ मोठ्या शहरात रुग्णाला नेण्यासाठी या रुग्णांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. त्यामुळे ही अत्यावश्यक सेवा नेमकी कोणासाठी आहे? असा सवाल केला जात आहे.
दि. १९ मे २०१४ रोजी मोठा गाजावाजा करीत शासनाने रत्नागिरी जिल्ह्याकरिता एक रुग्णवाहिका आरोग्य सेवेत दाखल केली. १0८ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर ती रूग्णवाहिका तत्काळ रूग्ण जिथे असेल तिथे जाऊन सेवा देते. प्रारंभी १०८ क्रमांकावर फोन केल्यानंतर १५ मिनिटांत दाखल होणाऱ्या या रुग्णवाहिकेला आता शासकीय रुग्णालयाच्या ठिकाणाहून मुंबई - पुणे अथवा कोल्हापूरसारख्या मोठ्या शहरातील रुग्णालयामध्ये अधिक उपचाराकरिता रुग्ण घेऊन जावे लागते. अशावेळी ही रुग्णवाहिका बराच काळ मुख्य ठिकाणापासून बाहेर राहते. अशावेळी एखादी घटना घडल्यास घटनास्थळी पोहोचण्याकरिता इतर ठिकाणावरील रुग्णवाहिकेला पाचारण करावे लागते. परिणामी योजनेचे उद्दिष्ट सफल होत नाही, असे निदर्शनास येऊ लागले आहे.
सधन रुग्ण उपचाराकरिता खासगी रुग्णालयामध्ये दाखल होतात. मात्र, त्यांना अधिक उपचाराकरिता मुंबई, पुणे अथवा कोल्हापूरकरिता जायचे असल्यास केवळ रूग्णवाहिकेचा खर्च टाळण्यासाठी हे रुग्ण जिल्हा रुग्णालयात दाखल होतात. दाखल झाल्यापासून अवघ्या काही मिनिटामध्ये या रुग्णसेवेचा लाभ घेतात व खासगी रुग्णवाहिकेला मोजावे लागणारे पैसे हे लोक वाचवतात. मोठ्या शहरामधील शासकीय रुग्णालयामध्ये रुग्ण दाखल करतात व थोड्याचवेळात तो तेथील खासगी रुग्णालयामध्ये हलवला जातो. सधन रुग्णांनी १०८ रुग्णवाहिकेचा लाभ घेणे हे उचित आहे काय? असा प्रश्न आता पुढे येऊ लागला आहे.
१०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेवरील वैद्यकीय अधिकारी व चालक यांना भत्ता मिळत नसल्याने ते गरीब रुग्णांना मुंबई अथवा पुणे या ठिकाणी रुग्णवाहिकेतून थेट नेण्याकरिता टाळाटाळ करतात. अशावेळी मुंबईकरिता जाण्यासाठी ठराविक अंतराने दोन ते तीन ठिकाणी राष्ट्रीय रूग्णवाहिका सेवेच्या रुग्णवाहिका बदलल्या जातात. हे रुग्णांच्या जीवितासाठी योग्य आहे काय? मात्र श्रीमंत रुग्णासाठी हेच वैद्यकीय अधिकारी व चालक थेट मुंबई वा पुण्यापर्यंत जाण्यास तयार असतात. अशावेळी त्यांना भत्ता कोण देतो? किंवा त्यावेळी त्यांना मुंबईत जाणे कसे परवडते, असा प्रश्नही केला जात आहे.
अपघातग्रस्त किंवा गरीब, गरजू रूग्णांसाठीच्या रुग्णवाहिकेचा गैरवापर करण्याचा सल्ला काही खासगी रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडूनच दिला जात असल्याची माहितीही पुढे आली आहे. मुंबईसाठी खासगी रूग्णवाहिका १0 ते १५ हजार इतका दर आकारतात, हे पैसे वाचवण्यासाठी ही क्लुप्ती लढवली जात आहे.


सेवा कोणासाठी? : रूग्ण जिल्ह्याबाहेर नेण्यासाठीच वापर जास्त

रूग्णवाहिकेने वाचविले हजारोंचे प्राण.
१५ मिनिटात रूग्णवाहिका दाखल होते.
मुख्य ठिकाणापासून रूग्णवाहिका दूर राहात आहे.
१०८ सेवेचा लाभ केवळ खासगी रूग्णवाहिकांचा खर्च वाचवण्यासाठीच होत आहे.


१०८ रूग्णवाहिकेवरील वैद्यकीय अधिकारी व चालकांना भत्ता मिळत नसल्याने गरीब रूग्णांना कोल्हापूर, पुणे येथे नेण्यासाठी टाळाटाळ केली जात असल्याचे प्रकार घडत आहेत.


मुंबईला जाण्यासाठी ठराविक अंतराने दोन ते तीन ठिकाणी १०८ रूग्णवाहिका बदलल्या जातात. त्यामुळे रूग्णांचे हाल होताना दिसत आहेत, याला जबाबदार कोण?

Web Title: Abuse of essential health care services

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.