आमदार वैभव नाईकांशी संबंधित संस्थेला एसीबीची नोटीस!, चौकशीला हजर राहण्याची सूचना
By सुधीर राणे | Published: November 30, 2023 03:52 PM2023-11-30T15:52:48+5:302023-11-30T16:04:03+5:30
युवक कल्याण ग्रामीण बिगर शेती पतसंस्था कणकवलीच्या शाखा व्यवस्थापकांना नोटीस
कणकवली: आमदार वैभव नाईक यांच्या कणकवली येथील युवक कल्याण ग्रामीण बिगर शेती पतसंस्था, कणकवली च्या शाखा व्यवस्थापकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची (एसीबीची) नोटीस आली आहे. त्यांच्या व्यवसायाशी निगडित असलेल्या पतसंस्था मधून काय व्यवहार झाले याबाबतची पडताळणी केली जात आहे. त्यासाठी ५ डिसेंबर रोजी संपूर्ण माहितीसह रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात चौकशीला हजर राहण्याचे आदेश या पतसंस्थेच्या शाखा अधिकाऱ्याना देण्यात आले आहेत.
आमदार वैभव नाईक यांची रत्नागिरी येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून यापूर्वी चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या मालमत्तांची मोजमापे घेतली गेली होती. तसेच त्यांचे उद्योग धंदे ,व्यवसाय यांचीही चौकशी करण्यात आली होती. त्या संबंधित व्यवस्थापकाना नोटिसा देण्यात आल्या होत्या. आता युवक कल्याण ग्रामीण बिगर शेती पतसंस्था ,कणकवली च्या शाखा व्यवस्थापकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक सुशांत चव्हाण यांनी नोटीस दिली आहे.