दाखलपात्र मुलांपेक्षा जास्त प्रवेश
By admin | Published: October 25, 2015 10:51 PM2015-10-25T22:51:01+5:302015-10-25T23:31:30+5:30
रत्नागिरी जिल्हा : सहा तालुक्यात अधिक वाढ
रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये चालू शैक्षणिक वर्षात १४०३४ मुलांनी प्रवेश घेतल्याचे पटसंख्या निश्चितीनंतर स्पष्ट झाले आहे. दाखलपात्र मुलांपेक्षा सुमारे १५०० अधिक मुलांनी प्रवेश घेतला.
ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील पटसंख्या कमी होऊ लागल्याने त्या बंद होण्याच्या मार्गावर आहेत. आज शेकडो शाळांची संख्या १० ते २०पेक्षा कमी असल्याने या शाळांचे भवितव्य अधांतरी आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून पटसंख्या वाढीसाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळते.
मागील शैक्षणिक वर्षामध्ये जिल्ह्यात इयत्ता पहिलीसाठी दाखलपात्र मुले किती आहेत, याची पाहणी जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी घरोघरी फिरुन केली होती. त्यामध्ये १२५३९ मुले दाखलपात्र असल्याची नोंद झाली होती. यामध्ये ६४९३ मुलगे आणि ६०४६ मुलींचा समावेश होता. या मुलांना चालू शैक्षणिक वर्षांमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी मुलांच्या पालकांचे प्रबोधन करण्यात आले होते.
चालू शैक्षणिक वर्ष सन २०१५-१६ च्या सप्टेंबरअखेर प्राथमिक शाळांची पटसंख्या निश्चित करण्यात आली. त्यामध्ये १४०३६ मुलांनी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रवेश घेतल्याचे स्पष्ट झाले. त्यामध्ये ७१२८ मुलगे आणि ६९०८ मुलींचा समावेश आहे.
चालू शैक्षणिक वर्षात दाखलपात्र मुलांपेक्षा प्रत्यक्ष दाखल झालेल्या मुलांची संख्या जास्त असली तरी ही वाढ सहा तालुक्यांत झालेली दिसून येत आहे. तर मंडणगड, रत्नागिरी आणि लांजा या तीन तालुक्यांमध्ये दाखलपात्र मुलांएवढीच मुले शाळेत दाखल झालेली आहेत. (शहर वार्ताहर)
मोफत शिक्षण : पटसंख्या वाढीचे जोरदार प्रयत्न
जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी ग्रामीण भागामध्ये वाडी-वस्त्यांमध्ये जाऊन अगदी डोंगराळ भागातही दाखलपात्र मुलांचे सर्वेक्षण केले होते. हे सर्वेक्षण करताना शिक्षकांची चांगलीच दमछाक झाली होती. तरीही या दाखलपात्र मुलांसाठी शिक्षकांनी संपूर्ण जिल्हा पिंजून काढला होता. हे सर्वेक्षण शहरी भागातही करण्यात आले होते.
जिल्हा परिषदेच्या शाळांकडे ग्रामीण विद्यार्थ्यांनीही पाठ फिरवल्याची चर्चा एकीकडे सुरु असताना दुसरीकडे जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या दृष्टीने ही आनंददायी खबर आहे. जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये पटसंख्या वाढल्याचे समाधानकारक चित्र या शैक्षणिक वर्षात दिसून आले.
जिल्हा परिषदेने गेल्या दोन वर्षात विविध उपक्रम राबवले आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा सुधारला आहे. त्याचबरोबर शाळाबाह्य मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठीही प्रयत्न चालवले आहेत. त्याचा परिणाम म्हणून पटसंख्येत यंदा समाधानकारक वाढ झाली असल्याचे जिल्हा परिषदेतील एका पदाधिकाऱ्याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
तालुकादाखलपात्र दाखल
मुलेझालेली
मुले
मंडणगड ६०१ ६०१
दापोली१४७३ १६९६
खेड११७१ १३७४
चिपळूण१५२० २०८३
गुहागर११७० १२६६
संगमेश्वर१६२५ १८०९
रत्नागिरी२५९५ २५९५
लांजा ९५३ ९५३
राजापूर१४३१ १६५९
एकूण -१२५३९१४०३६