कुडाळ येथे भीषण अपघात सावंतवाडीतील युवकाचा मृत्यू, जत्रेतून परत येताना काळाचा घाला
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: March 5, 2024 12:16 PM2024-03-05T12:16:29+5:302024-03-05T12:40:12+5:30
कुडाळ ( सिंधुदुर्ग ) : कुडाळ येथे महामार्गावर झालेल्या अपघातात सावंतवाडीतील जय अंबे स्वीट मार्टच्या रायका कुटुंबातील युवक रतन ...
कुडाळ (सिंधुदुर्ग ) : कुडाळ येथे महामार्गावर झालेल्या अपघातात सावंतवाडीतील जय अंबे स्वीट मार्टच्या रायका कुटुंबातील युवक रतन प्रकाश रायका (४५, मूळ राजस्थान सध्या रा. सावंतवाडी) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी ५ वाजण्याच्या सुमारास कुडाळ येथे घडली. दरम्यान यात अन्य तिघेजण जखमी झाले आहेत.
लादु रायका, साई परब व निलू अशी त्यांची नावे आहेत. ते निपाणी येथे जत्रेसाठी गेले होते. तेथून परतत असताना हा अपघात घडला. त्यांना अधिक उपचारासाठी गोवा बांबूळी येथे हलविण्यात आले आहे. तर रतन याचा मृतदेह कुडाळ येथे ठेवण्यात आला असून शवविच्छेदनानंतर तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
काही वर्षांपूर्वी रतन यांच्या भावाचे इन्सुली घाटीत झालेल्या अपघातात निधन झाले होते. त्यानंतर या कुटुंबांवर दुसरा आघात झाला आहे. रतन हा इंजिनिअर होता. राजस्थान येथे मायनिंग कंपनीत तो काम करत होता. काही दिवसांपूर्वी तो सावंतवाडीत आला होता. त्यानंतर निपाणी येथे जत्रा असल्यामुळे ते चौघे ही गाडीने सोमवारी सायंकाळी त्या ठिकाणी गेले होते. तिथून परतत असताना हा अपघात घडला.
यावेळी नेमकी गाडी कोण चालवत होते याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही. याबाबतची माहिती त्यांच्या नातेवाईकांकडून देण्यात आली. रतनच्या पश्चात पत्नी, वडील, आई आणि छोटी मुलगी असा परिवार आहे.