Accident: कारचा टायर फुटून भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
By अनंत खं.जाधव | Published: August 28, 2022 05:29 AM2022-08-28T05:29:24+5:302022-08-28T05:29:53+5:30
Accident: बांद्याहून मालवण गोठणे कडे भरधाव वेगाने जाणाऱ्या कारचा पुढील टायर फुटून झालेल्या अपघातात दोघेजण जागीच ठार झाले तर एकजण गंभीर जखमी झाला असून अन्य एकजण किरकोळ जखमी झाला आहे.
सावंतवाडी - बांद्याहून मालवण गोठणे कडे भरधाव वेगाने जाणाऱ्या कारचा पुढील टायर फुटून झालेल्या अपघातात दोघेजण जागीच ठार झाले तर एकजण गंभीर जखमी झाला असून अन्य एकजण किरकोळ जखमी झाला आहे.ही घटना झाराप पत्रादेवी महामार्गावरील नेमळे येथे दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडला.
तर यातील जखमीना घेऊन जाणाऱ्या बांदा येथील 108 रूग्णवाहिकेला अपघातस्थळापासून काहि अंतरावर रूग्णवाहिकेने पेट घेतल्याने एकच गोंधळ उडाला अखेर रूग्णवाहिकेच्या चालकाने व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रसंगावधान राखत जखमीला बाहेर काढत दुसऱ्या रूग्णवाहिके तून कुटीर रुग्णालयात दाखल केले.
मालवण तालुक्यातील गोठणे येथील लोचन सुरेश पालांडे( 45) संतोष भास्कर परब( 40) दीपक गोविंद आचरेकर (32) विशाल वसंत हाटले (40) हे चौघेजण बांदा येथे गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर घाऊक खरेदीसाठी गेले होते तेथून खरेदी करून दुपारच्या सुमारास पुन्हा गोठणे कडे परतत असतना त्याची कार झाराप पत्रादेवी महामार्गावरील मळगाव नेमळेच्या जवळ आली असता कारचा पुढील टायर फुटून कार डिव्हायडर ओलांडून रस्त्याच्या पलीकडे तब्बल 300 ते 400 मीटर शेतात जाऊन उलटली.ही कार विशाल हाटले हा चालवत होता.
अपघाता नंतर चालकासह त्याच्या बाजूला बसलेला लोचन पालांडे व मागील सीटवरील संतोष परब हे रस्त्यावर फेकले गेले त्यातील पालांडे व परब हे जागीच ठार झाले तर चालकांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी येथे हलविण्यात आले आहे.तर दीपक आचरेकर हा सुखरूप आहे.
अपघाताची भीषणता बघता कार अपघातानंतर डिव्हायडर ओलांडून तब्बल चारशे ते पाचशे मीटर लांब शेतात जाऊन पडली या कार मध्ये मोठ्याप्रमाणात फटाके तसेच सजावटीचे सामान होते.तर काहि सामान अपघातानंतर रस्त्यावर पडले होते.तर यातील मृत परब व पालांडे यांचे मृतदेह ही रस्त्यावर पडले होते.स्थानिक ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार कारचा वेग नियंत्रण बाहेर होता त्यामुळे चालकाचा कार वरील ताबा सुटल्याने कार डिव्हायडरला आपटून टायर फुटून रस्त्यापलीकडे शेतात गेली त्यामुळे हा एवढा मोठा भीषण अपघात घडल्याचे सांगितले.
दरम्यान, अपघातानंतर स्थानिक पोलीसासह वाहतूक पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत बांद्याच्या दिशेने जाणारी वाहतूक थांबवून मृतदेह रूग्णवाहिकेतून उपजिल्हा रुग्णालयात हलविले.तसेच रस्त्यावर विखुरलेले सामान ही बाजूला केले.तसेच या घटनेतील किरकोळ जखमी दिपक आचरेकर यांच्याकडून पोलीसांनी माहिती घेतली त्यावेळी कार मृत पालांडे यांच्या मालकीची असून गंभीर जखमी असलेले हाटले हे कार चालवत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
अपघातानंतर जखमीना नेतना रूग्णवाहिका जळून खाक
अपघाताची भीषणता एवढी भयानक होती कि मृताच्या रक्ताचा सडा रस्त्यावर पडला होता.यातील जखमी हाटले यांना बांदा येथील रूग्णवाहिकेतून उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात येत असतनाच बांदा येथील 108 रूग्णवाहिकने अपघाता पासून काहि अंतरावर पेट घेतला मात्र रूग्णवाहिका चालक सावळाराम गवस यांच्यासह वैद्यकीय अधिकारी अनघा बांद्रे यांनी प्रसंगावधान राखत जखमींना रूग्णवाहिकेतून बाहेर काढत दुसऱ्या रूग्णवाहिकेतून रूग्णालयात हलविण्यात आले.