खेडजवळ अपघात; शिरगावचे दोघे ठार
By Admin | Published: February 22, 2016 12:17 AM2016-02-22T00:17:36+5:302016-02-22T00:17:36+5:30
पाच गंभीर : लग्नाला जाताना सुमोची कारला धडक
शिरगाव : आपल्या जीवलग मित्राच्या लग्नसोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी मुंबईहून शिरगावकडे सँट्रो कारने येत असताना खवटी (ता. खेड, जि. रत्नागिरी) येथे समोरून येणाऱ्या टाटा सुमोला धडक बसल्यामुळे शिरगाव तावडेवाडी (ता. देवगड) येथील दोन युवक जागीच ठार झाले, तर पाचजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी मध्यरात्री १२ वाजून सहा मिनिटांनी घडली. या अपघातात प्रसाद सुरेश तावडे (वय २७) आणि तुषार शामसुंदर तावडे (२९, दोघेही रा. शिरगाव) हे दोघे ठार झाले आहेत.
शिरगाव तावडेवाडी येथील तुषार शामसुंदर तावडे, प्रसाद सुरेश तावडे, नरेश विजय तावडे (२७), यतीन राजाराम तावडे (२८) व योगीत तावडे हे नोकरीनिमित्त मुंबई येथे राहतात. हे सर्वजण आपल्या मित्राच्या लग्नसोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी १९ फेबु्रवारीला रात्री मुंबईहून शिरगावकडे सँट्रो कार (एमएच ०७ क्यू ४१७०)मधून येत होते. प्रसाद तावडे गाडी चालवित होता. प्रसादचा मित्र सागवेकर याचे आज, सोमवारी लग्न आहे. या समारंभासाठी सर्वजण येत होते.
मुंबई-गोवा महामार्गावरील खेडजवळील खवटी येथे सँट्रो कारची समोरून येणाऱ्या टाटा सुमो (एमएच ०७ जे ०३१८)शी समोरासमोर धडक झाली. या अपघातात तुषार तावडे व प्रसाद तावडे हे जागीच ठार झाले, तर यतीन राजाराम तावडे, नरेश तावडे आणि योगीत तावडे हे गंभीर जखमी झाले आहेत. सुमोमधील दोघेजणही या अपघातात जखमी झाले आहेत. मात्र, त्यांची नावे समजू शकली नाहीत. सर्व जखमींना कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. सुमोचालकाने चुकीच्या बाजूने गाडी आणल्याने हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही सुमो सावंतवाडी येथील असून, ती गोव्याहून मुंबईकडे जात होती.
या अपघाताची माहिती भ्रमणध्वनीद्वारे शिरगाव येथे समजताच शिरगाव येथील राजे ग्रुपच्या संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नातेवाईक घटनास्थळी रुग्णवाहिकेसह तातडीने रवाना झाले. अपघातातील जखमी यतीन तावडे व नरेश तावडे यांना अधिक उपचारांसाठी तातडीने मुंबई येथे हलविण्यात आले. त्यातील नरेश याच्या किडणीला मार लागल्याने त्याच्यावर मुंबई येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातातील मृत तुषार तावडे, प्रसाद तावडे यांचे खेड येथे शवविच्छेदन करून मृतदेह अंतिम संस्कारासाठी नातेवाइकांकडे देण्यात आले.
तुषार तावडे हा मुंबई येथे कोटक महिंद्रा बॅँकेत डेप्युटी मॅनेजर या पदावर होता. त्याच्या पश्चात पत्नी, चार वर्षांची मुलगी, आई, वडील, भाऊ, चुलते असा परिवार आहे. त्याचे वडील देवगड अर्बन बॅँकेत कुडाळ शाखेत शाखा व्यवस्थापक असून, आई शिक्षिका आहे. तर प्रसाद तावडे हा मुंबई येथे खासगी कंपनीत कामाला होता. त्याचे आठ महिन्यापूर्वीच लग्न झाले होते. त्याच्या पश्चात पत्नी, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.
शिरगाववर शोककळा
या अपघाताची बातमी सकाळी वाऱ्यासारखी शिरगावात पसरली आणि गावावर शोककळा पसरली. सायंकाळी तुषारचा मृतदेह शिरगाव येथे आणण्यात आला. यावेळी बाजारपेठ बंद ठेवून गावातील सर्वांनीच तावडेवाडीकडे धाव घेतली.
अत्यंत शोकाकूल वातावरणात रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या आईवडिलांच्या आक्रोशाने सर्वांचेच मन हेलावले. प्रसाद तावडे याचे कुटुंबीय मुंबई येथे असल्याने त्याच्यावर मुंबई येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.