कारचालकाने दुचाकीला मागून धडक दिल्याने अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2020 06:33 PM2020-11-20T18:33:31+5:302020-11-20T18:34:51+5:30
accident, sindhudurgnews आचरा-मालवण रस्त्यावर आचरा टेंबली येथे दारुच्या नशेत असलेल्या कारचालकाने दुचाकीस्वारास पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले.
आचरा : आचरा-मालवण रस्त्यावर आचरा टेंबली येथे दारुच्या नशेत असलेल्या कारचालकाने दुचाकीस्वारास पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले.
या अपघाताची भीषणता एवढी होती की दुचाकी व त्यावरील पितापुत्र दोघेही दूरवर फेकले गेले. या अपघातात कारच्या दर्शनी भागाचा पुरता चक्काचूर झाला व दुचाकीचेही नुकसान झाले. अपघातातील जखमींना मालवण येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. हा अपघात सोमवारी रात्री झाला. कार चालकावर आचरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत वृत्त असे की, आचरा पिरावाडीतील रहिवासी रवींद्र रामचंद्र जोशी (५७) व त्यांचा मुलगा ओंकार रवींद्र जोशी (२७) हे सोमवारी रात्री आपल्या ताब्यातील दुचाकीने मालवणवरून आचऱ्याच्या दिशेने येत होते. आचरा येथे पोहोचण्यासाठी काही मिनिटांचे अंतर असताना आचरा टेंबलीनजीक आले असता मागून भरधाव वेगाने कार घेऊन येणारे चेतन गजानन राऊळ (२८, रा. पिंगुळी मठ) यांनी जोशी यांच्या दुचाकीस जोरदार धडक दिली.
ही धडक एवढी जोरदार होती की दुचाकीसह पिता-पुत्र जोशी हे दूर फेकले गेले. यात रवींद्र जोशी यांच्या पायाला तर ओंकार जोशी यांच्या डोक्याला व पाठीला मार लागला.
कार चालविणारे राऊळ हे दारुच्या नशेत होते असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. कारचालक राऊळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा तपास आचरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत फारणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल देसाई व चव्हाण करीत आहेत.
...अन्यथा मोठा अनर्थ घडला असता
पिंगुळी येथील चेतन राऊळ हे भरधाव वेगाने आपल्या ताब्यातील कार घेऊन आचरा दिशेला येत होते. सुरुवातीला रस्त्यावर असलेल्या बैलाला त्यांच्या कारची धडक बसली. त्यानंतर पुढे जात असलेल्या जोशी यांच्या दुचाकीस धडक बसली. बैलास धडक बसल्याने कारचा थोडा वेग कमी झाला असल्याने दुचाकीला बसलेल्या धडकेची तीव्रता कमी होती. ते ज्या वेगात आले त्या वेगात धडक बसली असती तर मोठा अनर्थ ओढवला असता, असे बोलले जात आहे.