पिंगुळी येथे महामार्गावर अपघात; रिक्षाचालकाचा मृत्यू

By admin | Published: November 25, 2015 11:47 PM2015-11-25T23:47:21+5:302015-11-25T23:47:21+5:30

ट्रकचालक ताब्यात

Accidents on Highway at Pinguli; Death of autorickshaw driver | पिंगुळी येथे महामार्गावर अपघात; रिक्षाचालकाचा मृत्यू

पिंगुळी येथे महामार्गावर अपघात; रिक्षाचालकाचा मृत्यू

Next

कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गावर पिंगुळी वडगणेश येथे ट्रक व रिक्षा यांच्यात झालेल्या भीषण अपघातात रिक्षाचालक महेश मल्ला पाटील (वय ३२, रा. साळगाव) हा गंभीर जखमी झाला होता. उपचारादरम्यान त्याचे निधन झाले. हा अपघात बुधवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडला.
याबाबत वृत्त असे की, कुडाळहून झारापकडे रिक्षा घेऊन महेश पाटील जात होता. याचवेळी समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकवरील चालक सलीम शेख (रा. जालना) याचा ताबा सुटला. त्याने विरुद्ध दिशेला ट्रक घेऊन महेश पाटीलच्या रिक्षाला जोरदार धडक दिली. त्याने रिक्षाला १५ ते २0 फुटांपर्यंत लांब फरफटत नेले. यात पाटील जखमी झाला. उपचारादरम्यान त्याचे निधन झाले. रिक्षाचालक महेश पाटील झारापमध्ये व्यवसाय करीत होता. बुधवारी दुपारी तो कुडाळला प्रवासी भाडे घेऊन आला होता व पुन्हा झाराप येथे परतत होता. सुदैवाने या रिक्षामध्ये कोणीही प्रवासी नव्हते. (प्रतिनिधी)
रिक्षामध्ये अडकला महेश
या भीषण अपघातात रिक्षामध्ये महेश अडकून पडला होता. त्याला ग्रामस्थांनी तत्काळ बाहेर काढत कुडाळ ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र, डोक्याला व छातीला गंभीर स्वरूपाची दुखापत झाल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
महेश आज मुंबईला जाणार होता
महेशची पत्नी, मुलगा व मुलगी मुंबईला नातेवाइकांकडे गेले होते. त्यांना आणण्यासाठी महेश आज, गुरुवारी मुंबईला जाणार होता. मात्र, काळाने याअगोदरच त्याच्यावर घाला घातला. या अपघाताची नोंद कुडाळ पोलिसांत झाली असून, घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक सचिन पवार यांनी पंचनामा केला. ट्रकचालक सलीम शेख याला ताब्यात घेतले असून, याबाबत अधिक तपास कुडाळ पोलीस करीत आहेत.

Web Title: Accidents on Highway at Pinguli; Death of autorickshaw driver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.