आंबोलीत दोन वाहनांमध्ये अपघात
By admin | Published: July 10, 2016 11:56 PM2016-07-10T23:56:44+5:302016-07-10T23:56:44+5:30
चौघे गंभीर जखमी : रूग्णालयात दाखल
सावंतवाडी : आंबोली-नेनेवाडी येथे आय-२० व तवेरा कारमध्ये समोरासमोर झालेल्या अपघातात आय-२० कारमधील बेळगाव येथील चौघांना गंभीर दुखापत झाली. जखमींना तात्काळ सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात रविवारी सायंकाळी घडला. पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत नोंद करण्यात आली नव्हती.
बेळगाव येथील रिजवान शेख यांच्या सावंतवाडीतील नातेवाइकांचा चार दिवसांपूर्वी अपघात झाला होता. त्यांना पाहण्यासाठी आपल्या ताब्यातील आय-२० या कार ने बेळगाव ते सावंतवाडी असा प्रवास करीत होते.
दरम्यान, आंबोली-नेनेवाडी येथील धोकादायक वळणावर समोरून येणाऱ्या तवेरा कारने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली.
या अपघातात रिजवान मुल्ला (वय ३५), महम्मद टपालवाले (वय २८), जैगुण सत्तार (वय ५०), रियाना फारूक गोये (वय ३३, सर्व रा. बेळगाव) हे जखमी झाले. त्यांना कुटीर रुग्णालयात दाखल केले. या अपघाताची सावंतवाडी पोलिस ठाण्यात नोंद नव्हती.
सावंतवाडी येथे झालेल्या अपघातात जखमी झालेल्या नातेवाइकांची भेट घेण्यासाठी येत असताना हा अपघात झाला. या अपघातापूर्वी त्यांचा टेम्पो ट्रॅव्हलरशी अपघात झाला होता. त्यावेळी त्यांना कोणती दुखापत झाली
नव्हती. (वार्ताहर)
आंबोलीत पर्यटकांची उच्चांकी गर्दी
मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत असल्याने आंबोलीत वर्षा पर्यटनासाठी कोल्हापूर, सांगली, बेळगाव, गोवा, सिंधुदुर्ग येथून मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाले होते. पोलिसांच्या म्हणण्यानुसार तीस ते पस्तीस हजार पर्यटक आंबोलीत आले होते. पर्यटकांच्या उच्चांकी गर्दीने तब्बल पाच ते सहा तास वाहतूककोंडी झाली होती. मात्र, पोलिसांनी वेळीच रस्त्यावर उतरून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दुपारनंतर वाहतूक कोंडी सुटण्यास मदत झाली.