निकषानुसारच शिक्षक अतिरिक्त ठरणार!
By admin | Published: June 20, 2016 12:24 AM2016-06-20T00:24:02+5:302016-06-20T00:24:02+5:30
शाळांची कार्यशाळा : संच मान्यतेनुसार संख्या निश्चित
टेंभ्ये : सन २०१५-१६ च्या आॅनलाईन संच मान्यतेनुसार अतिरिक्त व रिक्त शिक्षकांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. यानुसार शिक्षक अतिरिक्त ठरलेल्या शाळांमधून अतिरिक्त शिक्षकांची नावे निश्चित करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. याबाबत जिल्ह्यातील संबंधित शाळांची कार्यशाळा पटवर्धन हायस्कूल, रत्नागिरी येथे झाली. शासन निकषानुसारच शिक्षक अतिरिक्त ठरविले जाणार असल्याचे शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी यावेळी स्पष्ट केले. यासाठी महाराष्ट्रातील खासगी शाळांमधील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावलीतील तरतुदीनुसार अतिरिक्त शिक्षक निश्चित करावा, असे आवाहन लोहार यांनी केले आहे.
जिल्ह्यातील काही शाळांमधून सेवाज्येष्ठ शिक्षकांना अतिरिक्त करण्याचा प्रयत्न सुरु असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी शिक्षक अतिरिक्त ठरविण्याच्या निकषांबाबत ‘लोकमत’शी संवाद साधला. शाळा सेवेच्या शर्ती नियमावली १९८१मधील नियम १२ अनुसूची ‘फ’नुसार शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांची सेवाज्येष्ठता यादी तयार करावी. इयत्ता ६ वी ते इयत्ता १० वीमधील पटसंख्या कमी झाल्यास प्रशिक्षित पदवीधर वर्गातील कनिष्ठतम कायम शिक्षक व इयत्ता १ ली ते इयत्ता ५ वी पर्यंतची विद्यार्थी संख्या कमी झाल्यास प्रशिक्षित अपदवीधर वर्गातील कनिष्ठतम शिक्षक अतिरिक्त ठरतील. अशा पद्धतीने शिक्षक अतिरिक्त ठरवताना अनुशेषाचा प्राधान्याने विचार करावा. शाळेतील मागासवर्गीय व्यक्ती ज्येष्ठतेनुसार कपातीस पात्र असेल. परंतु, शाळेतील त्यांची संख्या राखीव जागेच्या टक्केवारीनुसार अधिक नसेल तर संबंधित कर्मचाऱ्यांना अतिरिक्त ठरविता येणार नाही.
शिक्षक : शिक्षणाधिकारी करणार पडताळणी
शाळांनी पाठविलेल्या अतिरिक्त शिक्षकांची पडताळणी शिक्षणाधिकारी क़रणार आहेत. संस्थांनी अतिरिक्त ठरविलेला कर्मचारी हा कनिष्ठतम कायम कर्मचारी आहे का? मागासवर्गीय कर्मचाऱ्यांची विहीत टक्केवारी तपासून अतिरिक्त ठरविलेल्या कर्मचारी योग्य आहे का? शाळेतील विषयांची गरज लक्षात घेता योग्य कर्मचारी अतिरिक्त ठरविला आहे का? या सर्व प्रश्नांंच्या अनुषंगाने शिक्षणाधिकारी स्वत: अतिरिक्त शिक्षकांच्या यादीची पडताळणी करणार असल्याचे शिक्षणाधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले.
..तर शिक्षक अतिरिक्त
ज्या प्रवर्गातील शिक्षक अतिरिक्त ठरेल, त्या प्रवर्गातील कनिष्ठतम शिक्षक अतिरिक्त ठरवावा लागेल, असे किरण लोहार यांनी यावेळी बोलताना सांगितले.