रेल्वेतील चोरीप्रकरणी आरोपीला अटक
By admin | Published: February 5, 2016 12:51 AM2016-02-05T00:51:25+5:302016-02-05T00:51:25+5:30
आरोपी दार्जिलिंगचा : रत्नागिरी गुन्हा अन्वेषण शाखेची चिपळूणमध्ये कारवाई
रत्नागिरी : कोकण रेल्वेत एका महिन्यापूर्वी झालेल्या साडेबारा लाखांच्या चोरीप्रकरणी रत्नागिरी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने एका आरोपीला चिपळूणमध्ये अटक केली आहे. या चोरट्याने दागिने, मोबाईल व रोख रक्कम असा १२ लाख ५९ हजार ६०३ रुपयांचा ऐवज असलेली पर्स चोरली होती. ३ जानेवारी २०१६ रोजी ही घटना खेड तालुक्यातील आंजणी स्थानकावर घडली होती. विवेक ऊर्फ विकी यदू प्रधान (वय २३, कागे, जि. दार्जिलिंग, पश्चिम बंगाल) असे संशयित आरोपीचे नाव आहे. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
श्रीमती मैफिली बिपीन भेंडे (रा. ठाणे) ही महिला कोकण रेल्वेने प्रवास करीत होती. खेड तालुक्यातील आंजणी स्थानकावर त्यांच्या पर्सची चोरी झाली होती. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. हा तपास गुन्हा अन्वेषण शाखेकडे सोपविण्यात आला होता. त्यानुसार गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या माहितीवरून पोलिसांचे पथक चिपळूणला पाठविण्यात आले होते. या पथकाने संशयित विवेक प्रधानला ताब्यात घेतले.
त्याच्या चौकशीत गुन्हा त्यानेच केल्याचे उघड झाले. त्याच्याकडे चोरीस गेलेल्या ऐवजातील २४ हजार किमतीचे दोन मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले आहेत.
अटक आरोपीला खेड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या कारवाईत पोलीस निरीक्षक पाटील, उपनिरीक्षक मामा कदम, पोलीस कर्मचारी सुभाष माने, तानाजी मोरे, दिनेश आखाडे, राकेश बागूल, उदय वाजे, संदीप कोळंबेकर, प्रवीण बर्गे व रमीझ शेख यांनी सहभागी झाले होते.