आरोपीची तलावात उडी; बुडून मृत्यू
By admin | Published: May 6, 2016 11:39 PM2016-05-06T23:39:43+5:302016-05-07T00:54:01+5:30
सावंतवाडीतील घटनेने खळबळ : पलायनाचा प्रयत्न; झटापटीत दोन पोलिस अत्यवस्थ
सावंतवाडी : ओरोस येथील जिल्हा न्यायालयात तारखेला हजर करून पुन्हा सावंतवाडीतील कारागृहात जात असताना आरोपी नंदकिशोर बाबूराव सावंत (वय ३३, रा. कुडाळ) याने पोलिसांच्या हाताचा चावा घेत येथील मोती तलावात उडी टाकली.
यावेळी आरोपीसोबत असणाऱ्या दोन पोलिसांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून त्याला बाहेर काढण्यासाठी तलावात उडी मारली. यावेळी आरोपीसोबत झालेल्या झटापटीत पोलिसांच्या जिवावर हा प्रसंग बेतणार होता. मात्र, जागरूक नागरिकांनी बोटीच्या साहाय्याने दोन्ही पोलिसांना बाहेर काढले, तर आरोपी नंदकिशोर सावंत याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली.दरम्यान, आरोपीला वाचवण्यास गेलेल्या पोलिसांच्या छातीत व पोटात पाणी गेल्याने दोन्ही पोलिस अत्यवस्थ असून, येथील उपजिल्हा रुग्णालयात त्यांना उपचारांसाठी दाखल करण्यात आले. ३१ मे २०१५ ला कुडाळ येथे स्वत:च्या वडिलांवर पाळ-कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी नंदकिशोर बाबूराव सावंत याला निकाल लागेपर्यंत सावंतवाडी कारागृहात ठेवण्यात आले होते. पोलिस त्याला प्रत्येक तारखेला ओरोस येथील न्यायालयात हजेरीसाठी घेऊन जात होते. त्याप्रमाणेच शुक्रवारी सकाळी ओरोस येथील मुख्यालयातील पोलिस हेडकॉन्स्टेबल ज्ञानेश्वर गवस व पोलिस कॉन्स्टेबल प्रदीप चव्हाण हे दोघे सकाळी सावंतवाडीत आले. त्यांनी कारागृहातून आरोपी नंदकिशोर सावंत याला ताब्यात घेतले व एस.टी.नेच ओरोस येथील न्यायालयात हजर करण्यासाठी घेऊन गेले होते. तेथे त्याला २७ मे ही पुढील तारीख मिळाल्याने पोलिसांनी आरोपीला घेऊन सावंतवाडीकडे प्रयाण केले. दुपारी १ च्या सुमारास सावंतवाडीत आल्यानंतर आरोपीला घेऊन ते एस.टी. बसस्थानकावरून कारागृहाकडे पायी जात होते. यावेळी मोती तलावाच्या काठावरून चालत असताना आरोपीने प्रदीप चव्हाण या पोलिसाच्या हाताचा चावा घेत मोती तलावात उडी घेतली. यामुळे दोन्ही पोलिस भेदरून गेले.
या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक रणजित देसाई यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. तसेच मोती तलावात बुडालेल्या आरोपीच्या शोधासाठी सांगेली येथील बाबल आल्मेडा टीमला पाचारण केले. आल्मेडा यांच्या टीमने साडेतीन वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत मोती तलावात शोधाशोध केली; परंतु आरोपी सावंत उशिरापर्यंत सापडला नव्हता.
आरोपींना बेड्या नाहीत, गाड्यांची कमतरता
एखाद्या आरोपीला सावंतवाडी कारागृहातून ओरोस येथील न्यायालयात तारखेसाठी घेऊन जात असताना सर्वोेच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे आरोपीच्या हातात बेड्या घालता येत नाहीत. तसेच आरोपींना ने-आण करण्यासाठी गाड्यांची कमतरता असल्याने एस.टी. बसनेच आरोपींची ने-आण केली जाते. त्यामुळे अनेकवेळा आरोपी पोलिसांच्या असहायतेचा गैरफायदा घेतात, अशी चर्चा उपस्थित नागरिकांतून होत होती.
आरोपी मेकॅनिक इंजिनिअर, मात्र मनोरुग्ण
आरोपी नंदकिशोर सावंत हा उच्चशिक्षित होता. मात्र, तो मनोरुग्ण होता, असे त्याच्या आईनेच वडिलांवर प्राणघातक हल्ला केल्यानंतर पोलिसांना सांगितले होते. आरोपी सावंत याच्यावर कुडाळ पोलिस ठाण्यात ३०७ कलमान्वये गुन्हा दाखल आहे. आरोपी हा पेशाने मेकॅनिकल इंजिनिअर आहे. (प्रतिनिधी)
तलावात आरोपीसोबत पोलिसांची झटापट
आरोपी नंदकिशोर सावंत याने मोती तलावात उडी मारल्यानंतर क्षणाचा विलंब न लावता पोलिस कॉन्स्टेबल प्रदीप चव्हाण यांनी तलावात उडी मारत आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी आरोपीसोबत पोलिस चव्हाण यांची झटापटही झाली. आरोपीने पोलिस चव्हाण यांनाच आपल्या मिठीत घेत आपल्या बरोबर बुडवण्याचा प्रयत्न केला. यामुळे तलावाकाठी एकच खळबळ माजली.
बाबल आल्मेडा टीमकडून
तलावात मृतदेहाचा शोध
सावंतवाडी मोती तलावात उडी मारलेला आरोपी नंदकिशोर सावंत उशिरापर्यंत सापडला नव्हता. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास सांगेली येथील बाबल आल्मेडा यांच्यासह अभय किनळोस्कर, सुनील मडगावकर, दीपेश शिंदे, बाबा फर्नांडिस आदींनी तलावात उतरून शोधाशोध केली. सायंकाळी उशिरा मालवण येथील स्कुबा ड्रायव्हर्सच्या पथकाने त्याचा मृतदेह बाहेर काढला.
सीआयडी पथक सावंतवाडीत दाखल
शुक्रवारी झालेल्या आरोपीच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी सीआयडीच्या अप्पर पोलिस अधिक्षका एस. काळे या सायंकाळी उशिरा दाखल झाल्या. घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत सीआयडीचे पोलिस उपअधीक्षक कांबळे उपस्थित होते.