चोरीप्रकरणी आरोपीस ३ महिने १५ दिवसांच्या कैदेची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 04:25 PM2019-10-11T16:25:59+5:302019-10-11T16:27:50+5:30
चोरी प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी साहिल लवू पाटील (२१, रा. दादर पेण-रायगड) याला मुख्य न्यायदंडाधिकारी वर्षाराणी पत्रावळे यांनी ३ महिने १५ दिवसांच्या कैदेची शिक्षा सुनावली आहे.
सिंधुदुर्गनगरी : चोरी प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी साहिल लवू पाटील (२१, रा. दादर पेण-रायगड) याला मुख्य न्यायदंडाधिकारी वर्षाराणी पत्रावळे यांनी ३ महिने १५ दिवसांच्या कैदेची शिक्षा सुनावली आहे.
तक्रारदार अनिकेत अशोक खानविलकर (२९, रा. अंधेरी-मुंबई) हे १३ मे २०१९ रोजी रत्नागिरी-मडगांव एक्सप्रेसने विलवडे ते थिवीम असा प्रवास करीत होते. ही रेल्वे सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशनला क्रॉसिंगसाठी थांबली होती.
दरम्यान, अनिकेत हे सकाळी ८.३५ ते ८.४५ दरम्यान बाथरूमला गेले होते. यावेळी अज्ञाताने त्याच्या संमतीशिवाय १५ हजार रुपयांचा लॅपटॉप, ४५०० चा मोबाईल आणि २७०० रुपये किमतीचे हार्डडिक्स चोरून नेले होते.
याबाबतची तक्रार ७ जून २०१९ रोजी सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. याबाबतचा अधिक तपास सिंधुदुर्गनगरी पोलीस करीत होते.
दरम्यानच्या कालावधीत मडगांव-गोवा पोलिसांनी आरोपी साहिल पाटील याला अशाच एक चोरीच्या प्रकरणात अटक केली होती. तपासात त्याने सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात दाखल गुह्यात चोरी केल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार सिंधुदुर्गनगरी पोलिसांनी साहिल याला मडगांव पोलिसांकडून ताब्यात घेत अटक केली होती.
याप्रकरणी त्याला न्यायालयात हजर केले असता प्रथम पोलीस कोठडी व नंतर न्यायालयीन कोठडी सुनावली होती. तेव्हापासून तो न्यायालयीन कोठडीत असून न्यायालयात झालेल्या सुनावणीत न्यायालयाने साहिल याला दोषी ठरवित ३ महिने १५ दिवस साधी कैदेची शिक्षा सुनावली आहे. तपासिक अंमलदार पोलीस हवालदार गुरुदास पाडावे यांनी काम केले.