आचरा बायपास रस्त्याच्या कामाला चालना, पोस्ट खात्याच्या उदासीनतेमुळे रखडले होते काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2022 18:21 IST2022-08-05T18:20:56+5:302022-08-05T18:21:33+5:30

कणकवली: आचरा बायपास रस्त्याच्या कामाला आता चालना मिळाली आहे. या रस्त्यात येणारी पोस्ट खात्‍याची जागा नगरपंचायत भूसंपादन प्रक्रियेद्वारे ताब्‍यात ...

Achara bypass road work was promoted, the work was stalled due to indifference of the post department | आचरा बायपास रस्त्याच्या कामाला चालना, पोस्ट खात्याच्या उदासीनतेमुळे रखडले होते काम

आचरा बायपास रस्त्याच्या कामाला चालना, पोस्ट खात्याच्या उदासीनतेमुळे रखडले होते काम

कणकवली: आचरा बायपास रस्त्याच्या कामाला आता चालना मिळाली आहे. या रस्त्यात येणारी पोस्ट खात्‍याची जागा नगरपंचायत भूसंपादन प्रक्रियेद्वारे ताब्‍यात घेणार आहे. त्‍यासाठी १० लाख रूपयांच्या मोबदला रक्‍कमेची तरतूद नगरपंचायतीने केली आहे. त्‍यामुळे लवकरच ही जागा नगरपंचायतीच्या ताब्‍यात येऊन आचरा पर्यायी रस्ता खुला होणार आहे. हा रस्ता तयार झाल्‍यानंतर आशिये, कलमठ गावच्या विकासाला चालना मिळणार आहे. तसेच वाहन चालकांची वाहतूक कोंडीतूनही सुटका होणार आहे.

कणकवली-आचरा या मार्गाचा देवगड आणि मालवण तालुक्‍यांतील अनेक गावांत जाण्यासाठी वापर होतो. यातील कणकवली शहर ते कलमठ बाजारपेठपर्यंतचा रस्ता कमी रुंदीचा असल्याने तसेच या मार्गावर वाहनांची सातत्याने वर्दळ असल्याने सातत्‍याने वाहतूक कोंडी होते.

या वाहतूक कोंडीतून सुटका होण्यासाठी शहरातील एस.टी. बसस्थानक लगतची पोस्टाची जागा ते आशिये गाव, तेथून कलमठ ते वरवडे चव्हाण दुकान असा पर्यायी मार्ग काढण्यात आला. सन २००६ मध्ये या रस्त्याच्या कामाला मंजूरी मिळाली त्‍यामुळे पटवर्धन चौक ते वरवडे चव्हाण दुकान पर्यंतच्या मार्गाचा दर्जा ग्रामीण रस्ता असा झाला. सन २०१० पर्यंत या पर्यायी रस्त्याचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र पोस्ट खात्‍याच्या जागेचा अडसर आणि कलमठ गावातील ८८ जमीन मालकांना मोबदला रक्‍कम न मिळाल्याने हा रस्ता रखडला होता.

पोस्ट खात्‍याने नगरपंचायत जवळ इमारत बांधकाम परवानगी मागितली होती. यावेळी नगरपंचायत प्रशासनाने रस्त्यासाठी आवश्‍यक ते क्षेत्र सोडण्याची संमती दिल्‍यानंतरच परवानगी दिली जाईल अशी अट घातली. मात्र, पोस्ट खात्‍याकडून जागा सोडण्याबाबत काहीही कार्यवाही झाली नाही. त्‍यामुळे पोस्ट खात्‍याच्या अखत्‍यारीत येणारी जागा विकत घेण्यासाठी नगरपंचायतीकडून पोस्ट खात्‍याकडे गेली दहा वर्षे पत्रव्यवहार सुरू होता. परंतु केंद्राच्या अखत्‍यारीत येणाऱ्या पोस्ट खात्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. ५ ऑगस्‍ट २०२२ रोजी नगरपंचायतीने पोस्ट खात्‍याची जागा भूसंपादन करून ताब्‍यात घेण्याचा ठराव केला. त्‍याप्रमाणे आवश्‍यक त्‍या रस्त्याची जागा ताब्‍यात घेण्याचा प्रस्ताव देखील जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला.

पोस्ट खात्‍याच्या अखत्‍यारीत येणारी जागा भूसंपादन करण्यासाठी जिल्‍हाधिकाऱ्यांनी कणकवली प्रांताधिकाऱ्यांची भूसंपादन अधिकारी म्‍हणून नियुक्‍ती केली आहे. पुढील काही दिवसांत राष्‍ट्रीय महामार्ग ते पोस्ट खात्‍याच्या अखत्‍यारीत येणाऱ्या जागेची संयुक्‍त मोजणी होणार आहे. या मोजणीत रस्त्यासाठी आवश्‍यक ते क्षेत्र तसेच जागेत असणारी झाडे व इतर मालमत्ता यांची नोंद घेऊन त्‍यानुसार मोबदला रक्‍कम निश्‍चित केली जाणार आहे. हा मोबदला पोस्टखात्‍याला वर्ग केल्‍यानंतर ही जागा नगरपंचायतच्या ताब्यात मिळणार आहे.

Web Title: Achara bypass road work was promoted, the work was stalled due to indifference of the post department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.