परिमंडलातील बारा जणांवर कारवाई
By Admin | Published: March 25, 2015 10:25 PM2015-03-25T22:25:16+5:302015-03-26T00:08:30+5:30
कोकण विभाग : वीजचोरीविरोधात महावितरणची कडक मोहीम
रत्नागिरी : आकडा टाकून वीजेची चोरी, अनधिकृत वीज जोडण्या, शिवाय मीटरमध्ये छेडछाड करून वीज चोरी करणाऱ्या ५७२ ग्राहकांवर कोकण परिमंडलाकडून कारवाई करण्यात आली असून १ कोटी ३३ लाख ४ हजार ३४८.७२ रूपयांचा दंड आकारण्यात आला होता. पैकी १२ ग्राहकांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. हूक किंवा आकडा टाकून चोरी करणाऱ्या २२ ग्राहकांना पकडण्यात आले होते त्यांच्यावर ९८ हजार २४३ रूपयांचा दंड आकारण्यात आला होता. रत्नागिरी विभागात ६ तर सिंधुदुर्ग विभागात १६ असून, सिंधुदुर्गमध्ये सर्वाधिक आकडा टाकणाऱ्यांना पकडण्यात आले आहे. पैकी रत्नागिरी विभागातील एक व सिंधुदुर्गातील सहा जणांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. संबंधित सात ग्राहकांवर ४७ हजार ५५५ रूपयांचा दंड आकारण्यात आला आहे. तसेच १५ ग्राहकांनी ५३ हजाराचा दंड भरला आहे.अनधिकृत वीज जोडण्या रत्नागिरी विभागात ५४ तर सिंधुदुर्ग विभागात ५८ मिळून ११२ ग्राहकांवर १६ लाख १८ हजार २२८.३७ रूपयांचा दंड आकारण्यात आला आहे. पैकी एकूण ८९ ग्राहकांकडून १२ लाख ३१ हजार ४०९.३७ रूपये वसूल करण्यात आले आहे.मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या ४३८ ग्राहकांवर कारवाई करीत ८६ लाख १७ हजार ८७७.३५ रूपयांचा दंड आकारण्यात आला होता. पैकी ३९२ ग्राहकांनी १५ लाख २० हजार रूपये भरून वीज पुरवठा पूर्ववत करून घेतला आहे. पैकी रत्नागिरी विभागातील ४ व सिंधुदुर्गातील १ मिळून एकूण ५ जणांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. पाच ग्राहकांवर ५५ लाख ४ हजार २१० रूपयांचा दंड आकारण्यात आला आहे. वीजमीटर छेडछाडीमध्ये रत्नागिरी विभागात ३८५ तर सिंधुदुर्गमध्ये ५३ ग्राहक आढळले आहेत.महावितरणकडून सध्या फिडरनिहाय भारनियमन सुरू करण्यात आले आहे. ज्या फिडरवर वीज हानी अधिक शिवाय वसुली कमी असणाऱ्या फिडरची वर्गवारी करून भारनियमन करण्यात येते. शिवाय संगणक प्रणालीमुळे कोणत्या भागात वीजचोरी होते तात्काळ लक्षात येत असल्याने महावितरणच्या पथकाकडून वीजचोरी पकडण्यात येत आहे. एकूण ५७२ ग्राहकांपैकी रत्नागिरी जिल्ह्यात तीनही प्रवर्गातील ४४५ तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात १२७ ग्राहक आढळले आहेत. संबंधित कारवाई १ एप्रिल ते २८ फेब्रुवारी अखेर करण्यात आली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण विभागात ११७, खेड विभागात १३३ तर रत्नागिरी विभागात १३० तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ विभागात २९ तर कणकवली विभागात ९८ ग्राहक सापडले असून सर्वाधिक वीज चोरी खेड विभागात होत असली तरी पाठोपाठ रत्नागिरी विभागात चोरीचे प्रमाण वाढले आहे. (प्रतिनिधी)
वीज चोरी, अनधिकृत वीज जोडण्या व मीटरमध्ये छेडछेडीची प्रकरणे
५७२ ग्राहकांवर कारवाईचा बडगा
१२ जणांवर कायदेशीर कारवाई
१ लाखाहून अधिक दंड आकारला
खेड विभागात वीज चोरीची सर्वाधिक प्रकरणे, रत्नागिरी विभागातही लक्षणीय वाढ