जिल्ह्यातील १६ हजार ३७१ वाहनचालकांवर कारवाई

By admin | Published: April 10, 2015 11:10 PM2015-04-10T23:10:04+5:302015-04-10T23:41:12+5:30

किरण बिडकर : २९ कोटी ९६ लाखांचा महसूल वसूल; २0१५मध्ये १0५ टक्के उद्दिष्ट पूर्ण

Action on 16 thousand 371 drivers in the district | जिल्ह्यातील १६ हजार ३७१ वाहनचालकांवर कारवाई

जिल्ह्यातील १६ हजार ३७१ वाहनचालकांवर कारवाई

Next

सिंधुदुर्गनगरी : अतिवेगाने धोकादायक वाहतूक करणे, ओव्हरलोड वाहतूक करणे, खासगी वाहनातून प्रवासी वाहतूक करणे, विनापरवाना वाहन चालविणे या गुन्ह्यांखाली जिल्ह्यातील १६ हजार ३७१ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली असून त्यामार्फत २९ कोटी ९६ लाख रूपयांचा महसूल वसूल करण्यात आला आहे. ही सर्व कारवाई सन २०१४-१५ या आर्थिक वर्षात करण्यात आली असून महसुली उद्दीष्टाच्या १०५ टक्के काम झाले असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
ते म्हणाले, उपप्रादेशिक परिवहन विभागामार्फत (आरटीओ) शासनास दरवर्षी कोट्यवधी रूपयांचा महसूल प्राप्त होतो. हा विभाग म्हणजे महसूल गोळा होण्याच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण विभाग मानला जातो. सन २०१४-१५ या आर्थिक वर्षात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उपप्रादेशिक परिवहन विभागाला २८ कोटी ३१ लाख एवढे महसुली उद्दीष्ट दिले होते.
या उद्दीष्टाची पूर्तता करताना उपप्रादेशिक परिवहन विभागाने २९ कोटी ९५ लाख ७८ हजारांचा महसूल विविध कारवायांमध्ये गोळा केला आहे.
उद्दीष्टाच्या एकूण १०५ टक्के काम या विभागाने केले आहे. मागील म्हणजेच २०१३-१४ या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यावर्षी तब्बल २ कोटी ३७ लाखांची वाढ महसुली उत्पन्नात झाली आहे.
कर्मचाऱ्यांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत. ही पदे भरण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरू आहे. आमच्या विभागाने महसुली उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी चांगली कामगिरी केली. यात मोटारवाहन निरीक्षक सागर भोसले, किरण खोत, सहाय्यक मोटारवाहन निरीक्षक उदय पाटील, पी. आर. रजपूत यांनी चांगले काम केल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर यांनी दिली. (प्रतिनिधी)


३५ टक्के कर्मचाऱ्यांची पदे रिक्त; एका चालकाचा वाहन परवाना निलंबित
सावंतवाडी- इन्सुली येथील तपासणी नाक्यावर परराज्यातून येणाऱ्या तब्बल १३ हजार ६६८ वाहनचालकांविरोधात उपप्रादेशिक परिवहन विभागाने कारवाई करीत ४ कोटी ६७ लाख रूपये कारवाईतून वसूल केले आहेत. नियमित वाहनाचा टॅक्स न भरणे, वाहनाचे कागदपत्र अद्ययावत नसणे, वाहनाचे परमीट यामार्फत ही वसुली करण्यात आली आहे.
धोकादायक पद्धतीने वाहन चालवून एक नाही, दोन नाही तर तब्बल १० अपघातांस कारणीभूत ठरलेल्या एसटी महामंडळाच्या एका चालकाचा वाहन परवाना ५ वर्षांसाठी निलंबित केला आहे. त्यामुळे एसटी महामंडळ प्रशासनाने संबंधित वाहनचालकाची सेवा समाप्ती केली असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर यांनी दिली.
उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वायुवेग भरारी पथकाने धोकादायक वाहतूक करणे, प्रेशर हॉर्न, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, वाहनाच्या काचेवर काळी काच असणे आदी गुन्ह्यांतर्गत तब्बल २७०३ वाहनचालकांविरोधात कारवाईचा बडगा उचलत ५ कोटी २ लाखाएवढा दंड यामार्फत वसूल केला आहे.
आरटीओ कार्यालयात रिक्तपदे मोठ्या प्रमाणात असल्याने कामाचा ताण पडणे साहजिकच आहे, असे असूनसुद्धा गतवर्षीचे महसुली उद्दीष्ट १०५ टक्के पूर्ण करीत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर यांनी चांगले काम केले आहे. या विभागात सध्या मोटारवाहन निरीक्षकाची ३ पदे, सहाय्यक मोटारवाहन निरीक्षक ३ पदे, शिपाई (वर्ग ४) ३ पदे, पहारेकरी १ पद, क्लेरिकल स्टाफ अशी पदे रिक्त आहेत.

Web Title: Action on 16 thousand 371 drivers in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.