२३ हजार चालकांवर कारवाई
By admin | Published: August 18, 2015 11:38 PM2015-08-18T23:38:03+5:302015-08-18T23:38:03+5:30
दोन वर्षातील कारवाई : २३ लाख ५२ हजार रुपयांचा महसूल गोळा
सिंधुदुर्गनगरी : महामार्गावरील कसाल येथील महामार्ग वाहतूक पोलीस मदतकेंद्र स्थापन झाल्यापासून या पोलिसांनी दोन वर्षात संबंधित वाहनचालकांकडून सीट बेल्ट न लावणे, ओव्हरलोड, गाडीची कागदपत्र पूर्ण नसणे यासारख्या गुन्ह्यांमध्ये दंडात्मक कारवाई करून २३ लाख ५२ हजार ५०० रुपयांचा महसूल गोळा केला आहे. हा महसूल तब्बल २३ हजार वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारून केल्याचे समोर आले आहे. असे असले तरी मदतकेंद्र की वाहन तपासणीकेंद्र असा सवाल यावेळी उपस्थित होत आहे.
महामार्गावरील कसाल याठिकाणी २ जानेवारी २०१३ पासून महामार्ग वाहतूक पोलिसांचा मदत कक्ष स्थापन झाला. या मदत कक्षासंदर्भात जिल्ह्यातीलच नव्हे तर जिल्ह्याबाहेरील वाहनचालकांना कसाल याठिकाणी मदत कक्ष आहे तो माहिती आहे. कारण एम. एच. ०७ सोडले तर इतर पार्किंगच्या जवळ जवळ सर्वच गाड्या याठिकाणी तपासल्या जातात. त्यांची चौकशी होते. त्यामुळे प्रत्येक वाहनचालकाच्या ध्यानात राहील असा हा ‘मदत’ कक्ष आहे. महामार्गावर एखादा अपघात झाला तर त्या अपघातग्रस्तांना मदत करणे, अपघातामुळे वाहतूक कोंडी होणार नाही याकडे विशेष लक्ष देणे, एखाद्या वाहनचालकास कोणतीही मदत हवी असल्यास ती करणे, महामार्गावर झाड पडले असेल तर ते बाजूला करून महामार्ग सुरळीत करणे असा उद्देश या महामार्ग पोलिसांचा असून त्या अनुषंगानेच जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी कसाल येथे महामार्ग पोलिसांचे मदत कक्ष स्थापन झाले.
सुरुवातीला एका कच्च्या शेडमध्ये असणाऱ्या या कक्षाचे कालांतराने काही महिन्यातच पक्क्या शेडमध्ये रुपांतर झाले.
सुरुवातीला शासनाकडून महामार्ग पोलिसांना असणारे दंडात्मक कारवाईचे अधिकार काढून घेण्यात आले होते. मात्र, कालांतराने ते अधिकार पुन्हा सुपूर्द करण्यात आले. या मदत कक्षामध्ये सद्यस्थितीत १३ कर्मचारी असून याठिकाणी सिंधुदुर्ग पासिंगची एखाद दुसरी तर अन्य जिल्ह्यातील पासिंगच्या गाड्या याठिकाणी थांबवून चेक केल्या जातात. यात ट्रेलर, ट्रक, लक्झरी, ट्रॅव्हल्स यांच्याबरोबरच कारचाही समावेश असतो. यात वाहनचालक दोषी आढळला तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. मदत कक्ष स्थापन झाल्यापासून अद्यापपर्यंत २२ हजार ९०१ वाहन चालकांवर विविध गुन्ह्यात दंडात्मक कारवाई केल्याचे उघड झाले आहे. या कारवाईतून लाखोंचा महसूल गोळा झाला आहे.
अपघातस्थळी तत्काळ दाखल
खारेपाटण ते पत्रादेवी या १०८ किलोमीटरची जबाबदारी या १३ कर्मचाऱ्यांवर आहे. वरील अंतरामध्ये वाहन चालकाला कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवली तर महामार्ग पोलीस त्याला मदत करतात. परिसरात कोणत्याही ठिकाणी अपघात घडला तर महामार्ग पोलीस घटनास्थळी हजर राहून प्रसंगी जखमींना स्वत:च्या गाडीतून रुग्णालयापर्यंत पोहोचतात.
मदत कक्ष अनधिकृत जागेत?
कसाल येथे वाहनचालकांच्या मदतीसाठी उभारण्यात आलेल्या मदतकक्षासंदर्भात विचारणा केली असता संबंधित कर्मचारी म्हणाले की, ज्या जागेत मदत कक्ष उभारण्यात आले आहे ती जागा सार्वजनिक बांधकाम विभागाची असून ती हँडओव्हर झालेली नाही असे सांगण्यात आले.
सूचनांना वाटाण्याच्या अक्षता
सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असल्याने हंगामामध्ये दरवर्षी लाखो पर्यटक या जिल्ह्याला भेटी देऊन येथील निसर्गाचा आनंद लुटतात. मात्र वाहतूक पोलीस व कसाल येथील महामार्ग वाहतूक पोलीस मदत केंद्र येथे पर्यटकांना अडवून त्यांच्या गाड्यांची तपासणी केली जाते. त्यामुळे पोलिसांच्या या प्रकाराबद्दल पर्यटकांतून नाराजी असल्याची बाब कित्येकवेळा पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यासमोर आली आहे. पालकमंत्र्यांनी कैकवेळा पर्यटकांना त्रास देण्यात येवू नये असे सांगूनसुद्धा त्यांच्या सुचनांचे पालन संबंधित यंत्रणेकडून होताना दिसत
नाही. (प्रतिनिधी)
वाळू वाहनांवर अद्याप एकही कारवाई नाही
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ज्यावेळी गौण खनिज उत्खननास बंदी होती त्यावेळीही महामार्गावरून चिरे, वाळू वाहतूक होत होती. चिरे व वाळू वाहतूक करणारी वाहने या मदतकक्षाच्या बाहेर थांबलेली पहायला मिळत. मात्र, या वाहनचालकांवर महामार्ग पोलिसांनी एकही कारवाई केली नसल्याचे अहवालादरम्यान समोर आले आहे. या वाहनचालकांवर कारवाई न केल्याने नेमके गौडबंगाल काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. निवासी जिल्हाधिकाऱ्यांनीही या आधीही महामार्ग पोलिसांनी अनधिकृत वाळू वाहतूक करणाऱ्या चालकाला दंड केला नसल्याचे किंवा त्याला महसूल विभागाकडे पकडून दिले नसल्याचे स्पष्ट केले होते.
सालदोषी वाहनचालकांची संख्यादंडात्मक कारवाई
जानेवारी २०१३५३६६५ लाख ६१ हजार
२०१४१००६९१० लाख ३८ हजार २००
२०१५ जुलै अखेर७४६६७ लाख ५३ हजार ३००
एकूण२२ हजार ९०१२३ लाख ५२ हजार ५००