गौणखनिज उत्खननाविरोधात कारवाई तीव्र; दंडाच्या नोटिसा
By Admin | Published: December 11, 2014 12:14 AM2014-12-11T00:14:57+5:302014-12-11T00:33:13+5:30
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दंडाची रक्कम तीन ते चार कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकते
कणकवली : गौणखनिज उत्खनन बंदी असताना तालुक्यात होत असलेल्या गौणखनिज व्यवसायावर महसूल विभागाने कारवाई तीव्र केली असून, दंडात्मक वसुलीच्या नोटिसा बजावल्या आहेत. यामुळे व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. महसूलच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दंडाची रक्कम तीन ते चार कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकते.
गौणखनिज उत्खननाविरोधात महसूलची कारवाई गेले काही दिवस सुरू आहे. जनशताब्दी एक्स्प्रेसला झालेल्या अपघातानंतर कसवण परिसरातील क्रशर सुरू असल्याचे पुढे आले. त्यामुळे महसूल विभागाने त्यादृष्टीने चौकशी केली आणि अनेक व्यावसायिकांना उत्खननासंदर्भात नोटिसा बजावल्या आहेत. वाळू व्यावसायिक, चिरेखाण मालक आणि क्वॉरी व्यावसायिकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. किती उत्खनन करण्याची परवानगी देण्यात आली आहे याची विचारणा करण्यासोबत अतिरिक्त उत्खनन केलेल्यांना दंडात्मक कारवाईच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. एकूण दंडात्मक कारवाईची रक्कम काही कोटींच्या घरात जाऊ शकते. त्यामुळे व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
जनशताब्दी अपघातानंतर कसवण परिसरात क्रशर सुरू असल्याचे उघड झाले. गौणखनिज बंदी असताना क्रशर कसे काय सुरू झाले, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. महसूल विभागाकडून क्रशर मालकांनाही नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यानंतर कारवाईच्या भीतीने क्रशरवर असणारे खडीचे साठे तातडीने हलविण्यात आले. (प्रतिनिधी)