बाजारपेठेत विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई, खारेपाटण येथील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 07:01 PM2020-09-10T19:01:35+5:302020-09-10T19:03:41+5:30
खारेपाटण : सध्या जिल्ह्यातील कोरोनाचे प्रमाण वाढत असूनही नागरिक बिनधास्तपणे विनामास्क फिरत आहेत. तसेच सोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर बसवून ...
खारेपाटण : सध्या जिल्ह्यातील कोरोनाचे प्रमाण वाढत असूनही नागरिक बिनधास्तपणे विनामास्क फिरत आहेत. तसेच सोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर बसवून गर्दी करीत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर मंगळवारी खारेपाटण मुख्य बाजारपेठेत ग्रामपंचायतीच्यावतीने कणकवली तहसीलदार आर. जे. पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करून १६०० रुपये दंड म्हणून वसूल करण्यात आला.
यावेळी खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत, खारेपाटण-तळेरे मंडळ अधिकारी मंगेश यादव, उपसरपंच इस्माईल मुकादम, ग्रामपंचायत सदस्य योगेश पाटणकर, महेंद्र गुरव, ग्रामविकास अधिकारी जी. सी. वेंगुर्लेकर, ग्रामपंचयात लिपिक शैलेंद्र शेट्ये आदी उपस्थित होते.
दुपारी १२ वाजता बाजारपेठेत विना मास्क फिरणाऱ्या एकूण ८ जणांवर ग्रामपंचायत व ग्रामस्तरीय सनियंत्रण समितीच्यावतीने कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून १६०० रुपये दंड वसूल करण्यात आला. यावेळी मास्क न लावणाऱ्या नागरिकांकडून प्रत्येकी २०० रुपयांची पावती दंड आकारणी म्हणून घेण्यात आली.
प्रत्येकाला मास्कची सक्ती करा : आर. जे. पवार
सर्व व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानात येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला मास्क लावण्यासाठी सक्ती करावी व स्वत:ही मास्क लावावा. मास्क लावण्याचे फायदे अनेक आहेत. सार्वजनिक ठिकाणी विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कोविड-१९ शासन नियमानुसार नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
सर्व नागरिकांनी कोरोनाच्या काळात आपल्या आरोग्याची काळजी घेऊन स्थानिक ग्रामस्तरीय सनियंत्रण समिती, महसूल, पोलीस व आरोग्य यंत्रणेला सहकार्य करण्याची गरज आहे. शासन व प्रशासनाला सहकार्य केल्यास महामारीला रोखणे सोपे जाईल, असे मत तहसीलदार आर. जे. पवार यांनी व्यक्त केले.