थकीत पाणीपट्टी वसुलीसाठी कारवाई मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 01:52 PM2021-03-25T13:52:39+5:302021-03-25T13:54:30+5:30
Malavn Muncipalty Sindhudurg- मालवण पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने थकीत पाणीपट्टी वसुलीसाठी मंगळवारपासून धडक कारवाईची मोहिम हाती घेतली. या कारवाईत भूमि अभिलेख या शासकीय कार्यालयासह व एक कॉम्प्लेक्समधील दोन व तीन खासगी अशा एकूण सहा नळ कनेक्शन तोडण्यात आली.
मालवण : पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने थकीत पाणीपट्टी वसुलीसाठी मंगळवारपासून धडक कारवाईची मोहिम हाती घेतली. या कारवाईत भूमि अभिलेख या शासकीय कार्यालयासह व एक कॉम्प्लेक्समधील दोन व तीन खासगी अशा एकूण सहा नळ कनेक्शन तोडण्यात आली.
पालिकेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे, पाणीपुरवठा विभाग प्रमुख सोनाली हळदणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाणीपुरवठा अभिकर्ता राजा केरीपाळे यांच्यासह अन्य कर्मचार्यांनी ही कारवाई केली. यापुढेही थकीत पाणीपट्टी वसुलीसाठी नळजोडणी बंद करण्याची कार्यवाही केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
पाणीपुरवठा विभागाचे अभिकर्ता राजा केरीपाळे, सुनील चव्हाण, सुभाष कुमठेकर, तळवडेकर, सागर नरे यांच्या पथकाने ही कारवाई केली. यापुढेही थकीत पाणीपट्टी वसुलीसाठी धडक कारवाई मोहिम सुरूच ठेवण्यात येणार असल्याचे हळदळणकर, केरीपाळे यांनी सांगितले.
पालिकेस सहकार्य करावे : राजन वराडकर
ज्यांची वर्षानुवर्षे पाणीपट्टी व घरपट्टी थकीत आहे. त्यांच्यावर नळजोडणी तोडण्याची तसेच जप्तीची कारवाई पालिका प्रशासनाकडून करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी होणारी गैरसोय टाळण्यासाठी पाणीपट्टी थकबाकीदारांनी तसेच थकीत घरपट्टी धारकांनी थकीत रक्कम भरून पालिकेस सहकार्य करावे व कारवाई टाळावी असे आवाहन पालिका प्रशासनाच्यावतीने उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांनी केले आहे.