अनधिकृत वाळू उपसा करणाऱ्या होड्यांवर कारवाई
By admin | Published: October 1, 2016 11:53 PM2016-10-01T23:53:19+5:302016-10-02T00:15:03+5:30
महसूलची मोहीम : ३० सप्टेंबरला मुदत संपताच कलावल-तेरई खाडीपात्रात प्रशासन सक्रीय
मालवण : सिंधुदुर्गात होणाऱ्या वाळू उत्खननाची मुदत शुक्रवार ३० सप्टेंबर रोजी संपली असून अनधिकृत वाळू उत्खननावर महसूल व खनिकर्म विभागाची करडी नजर आहे. शुक्रवारी वाळू उत्खनन परवान्याची मुदत संपली असतानाही हडी व कालावल-तेरई खाडीपात्रात अनधिकृत वाळू उपसा करणऱ्या तब्बल सहा होड्यांवर जिल्हा खनिकर्म प्रशासनाने शनिवारी पहाटे सहा वाजता कारवाई केली आहे. वाळू उत्खनन बंदीच्या पहिल्याच दिवशी प्रशासनकडून धडक कारवाईचा बडगा उगारण्यात आल्याने वाळू व्यावसायिकांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.
वाळू उत्खननाची मुदत ३० सप्टेंबरला संपली आहे. त्यामुळे पुढील वाळू पट्ट्यांची लिलाव प्रक्रिया होत नाही तोपर्यंत वाळू उत्खननावर बंदी घालण्यात आली आहे. बंदी कालवधीत अनधिकृत वाळू उपसा होत असल्यास महसूल प्रशासनकडून कडक कारवाई करण्यात येणार आहे. खनिकर्म विभागाने केलेल्या कारवाईतील सहाही होड्यांचा पंचनामा करण्यात आला असून सोमवारी दंडात्मक कारवाई निश्चित केली जाईल, असे तहसीलदार वीरधवल खाडे यांनी स्पष्ट केले. यापुढेही अनधिकृत वाळू उत्खननावर महसूलकडून कारवाई केली जाईल, असेही खाडे यांनी सांगितले. त्यामुळे महसूल प्रशासनाच्या कारवाईकडे लक्ष लागून राहिले आहे.
वाळू उत्खननाची मुदत संपली असल्याने खनिकर्म विभागाच्या वतीने भल्या पहाटे अनधिकृत वाळू उत्खनन होत असलेल्या ठिकाणी कारवाईची मोहीम राबविण्यात आली. वाळू उत्खनन बंदीच्या पहिल्याच दिवशी खनिकर्म विभागाने धाड टाकत वाळू उत्खनन करताना होड्यांना पकडले. वाळूचा पंचनामा करून होड्या मालकांच्या ताब्यात देण्यात आल्या असल्या तरी संबंधित मालकांवर दंडात्मक कारवाई करण्याची प्रक्रिया महसूल विभागाकडून होणार आहे. जिल्हा खनिकर्म अधिकारी थोरात यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. यात दीपक सुर्वे यांची साडेतीन ब्रास, सुनील शेडगे यांची साडेतीन ब्रास, अमोल हुनारे तीन ब्रास, स्वप्नील मिठबावकर अडीच ब्रास, दीपक सुर्वे तीन ब्रास तर अन्य एका होडीवर कारवाई करण्यात आली.
गणेश चतुर्थीत १५ दिवस डंपर वाहतुकीवर बंदी असल्याने गणेशोत्सवात वाळू उत्खनन बंद होते. मात्र त्या १५ दिवसाची वाढीव मुदतीबाबत वाळू व्यावसायिकांकडून प्रशासनाकडे मुदत वाढ मागितली होती का? असाही सवाल उपस्थित होत आहे. प्रशासनाने केलेल्या पहिल्याच दिवशी कारवाई केल्याने वाळू व्यवसायिकांनी नाराजी व्यक्त केली.
वाळू उत्खनन मुदत संपली असली ती वाळू व्यावसायिकांच्या वाळू साठे शिल्लक असल्यास त्यांना वाळू उपाशाची परवानगी देण्यात यावी, अशीही मागणी वाळू व्यवसायिकांतून होत आहे. याबाबत तहसीलदार खाडे यांना विचारले असता वाळू व्यवसायिकांच्या मुदतवाढीचा निर्णय वरिष्ठ पातळीवरचा आहे. पण जर वाळू साठा करून ठेवला असल्यास जिल्हाधिकारी स्तरावर पास मिळण्याबाबत कार्यवाही होईल, खाडे यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)