कामचुकारांवर कारवाई झालीच पाहिजे
By admin | Published: November 21, 2015 10:52 PM2015-11-21T22:52:17+5:302015-11-21T23:56:59+5:30
प्रसाद मोरजकर आक्रमक : मालवण पंचायत समिती मासिक सभा
मालवण : पंचायत समितीतील काही कर्मचारी मनमानी पद्धतीने काम करतात. या कामचुकारपणाचा परिणाम गेली अनेक वर्षे चांगले काम करत असलेल्या पंचायत समिती प्रशासन व गटविकास अधिकारी यांच्या कार्यपद्धतीवर होत आहे. त्यामुळे अशा कामचुकार कर्मचाऱ्यांची गय न करता त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, अशी आक्रमक भूमिका पंचायत समिती सदस्य प्रसाद मोरजकर यांनी मासिक सभेत केली.
सभा सभापती सीमा परुळेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपसभापती देवानंद चिंदरकर, गटविकास अधिकारी राजेंद्र्र पराडकर, सदस्य राजेंद्र्र प्रभुदेसाई, प्रसाद मोरजकर, उदय दुखंडे, हिमाली अमरे, सुजला तांबे तसेच अधिकारी उपस्थित होते. गेले काही दिवस पंचायत समितीतील एका कर्मचाऱ्याच्या कामचुकारपणाबाबत गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रारी प्राप्त झाल्या. मात्र, त्याला सूचना करून सुधारण्याची संधी गटविकास अधिकाऱ्यांनीे दिली. त्यानंतरही त्याच्यात बदल न झाल्याने गटविकास अधिकाऱ्यांनी त्याच्या कामाचा चार्ज काढून घेत कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवला आहे. याबाबत प्रसाद मोरजकर यांनी सभेत प्रश्न उपस्थित करत कोणत्याही कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांना पाठीशी घालू नये.
तालुक्यात ‘नरेगा’ योजनेखाली १२ हजार रुपये अनुदान देत ५५० शौचालयांना मंजुरी देण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बाराशे बंधाऱ्यांचे उद्धिष्ट देण्यात आले आहेत. त्यापैकी ५३५ बंधारे पूर्ण झाले आहेत. उर्वरित लवकरच पूर्ण होतील. असे गटविकास अधिकारी पराडकर यांनी स्पष्ट केले. तर तालुक्यात कमी पावसामुळे संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता ग्रामसेवकही बंधारा बांधणीत पुढाकार घेत आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सर्वच रस्त्यांवर खड्डे आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूने झाडी वाढली आहेत. देवबागमध्ये सहा मीटर असणारे रस्ते अडीच मीटर झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे पूर्णत: दुर्लक्ष केले आहे.
चतुर्थीत वाळूने खड्डे बुजविले. वाळू वाहून गेल्यावर पुन्हा खड्डे पडले आहेत. जनतेच्या समस्या घेऊन अधिकाऱ्यांना भेटणे हे लोकप्रतिनिधींचे काम आहे. त्यामुळे एखाद्या सदस्यावरचा राग त्या विभागावर काढू नय, असे उपसभापती देवानंद चिंदरकर यांनी सांगत सार्वजनिक बांधकाम विभागावर नाराजी व्यक्त केली. (प्रतिनिधी)
बागायतमधील टॉवर कधी सुरू होणार?
४बागायत, माळगाव येथे चार वर्षापूर्वी बीएसएनएलचा टॉवर मंजूर झाला आहे. मात्र अद्याप टॉवरचे काम सुरु झाले नाही. त्यामुळे बागायत, माळगाव भागात नेटवर्क मिळत नाही.
४तो टॉवर केव्हा कार्यन्वित होणार असा सवाल माजी सभापती राजेंद्र प्रभुदेसाई यांनी केला.
४माळगाव शाळेतील मुख्याध्यापिकेच्या प्रश्नाबाबत २ डिसेंबरला पाहणी करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.