अनधिकृत मासेमारी, देवगड समुद्रात कर्नाटकच्या हायस्पीड ट्रॉलर्सवर कारवाई
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: December 3, 2024 11:54 AM2024-12-03T11:54:56+5:302024-12-03T11:55:49+5:30
मत्स्य विभागाच्या सागर सुरक्षा रक्षकांनी त्या बोटीवर उड्या मारून बोटीचे स्टेरिंग हाती घेत बोट ताब्यात घेतली.
देवगड (सिंधुदुर्ग ) : देवगड समुद्राच्या नस्तावर १२ वाव पाण्यात अनधिकृत मासेमारी करणाऱ्या कर्नाटक मलपी येथील हनुमा तीर्था या हायस्पीड बोटीवर सोमवारी रात्री ११ वा कारवाई करण्यात आली. यावेळी बोट जप्त करून देवगड बंदरात आणून मासळीचा लिलाव करण्यात आला.
देवगड समुद्रात गेली अनेक दिवस परप्रांतीय बोटींनी धुमाकुळ घातल्याने स्थानिक मच्छिमारांच्या बोटींना मासळी मिळत नव्हती. बाहेरील बोटी किनाऱ्याला येऊन मासेमारी करीत होते. सोमवारी मत्स्यव्यवसाय विभागाच्या गस्तीच्या वेळी रात्री ११ वा सुमारास देवगड समुद्राच्या नस्ताच्या ठिकाणी येऊन अनधिकृत मासेमारी करताना मलपी कर्नाटक येथील दिनेश कुंदर यांच्या मालकीची 'हनुमा तीर्था' ही बोट आढळून आली. मत्स्य विभागाने या बोटीला थांबण्याचा इशारा केला मात्र बोट जाळी टाकून पोबारा करण्याच्या तयारीमध्ये होती. याचवेळी मत्स्य विभागाच्या सागर सुरक्षा रक्षकांनी त्या बोटीवर उड्या मारून बोटीचे स्टेरिंग हाती घेत बोट ताब्यात घेतली.
या कारवाईमध्ये देवगडचे मत्स्य व्यवसाय परवाना अधिकारी पार्थ तावडे, देवगड पोलीस निलेश पाटील, सागर सुरक्षा रक्षक धाकोजी खवळे, अमित बांदकर, संतोष टूकरूल, योगेश फाटक, अल्पेश नेसवणकर, स्वप्नील सावजी हे सहभागी झाले होते. या बोटीवर तांडेलसह ७ खलाशी होते.