कारवाईवर प्रश्नचिन्हच
By admin | Published: March 15, 2015 10:14 PM2015-03-15T22:14:35+5:302015-03-16T00:16:58+5:30
जलस्वराज्य योजना : दोषींवर कारवाई न झाल्याने संताप
आरवली : संगमेश्वर तालुक्यातील कडवई ग्रामपंचायतीच्या जलस्वराज्य योजनेत मोठ्या प्रमाणावर अपहार झाल्याचे उघड झाल्यानंतर मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांनी संबंधित दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली होती. या मागणीनंतर जलस्वराज्य अध्यक्ष वसंत उजगावकर आणि सचिव कांचन कापडी यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात आली. तांत्रिक सल्लागार आणि शाखा अभियंता यांना मात्र याविषयात क्लिनचिट देण्यात आली असून, संबंधित दोषींवर अद्याप फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलेला नाहीत. यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. कडवई ग्रामपंचायतीच्या जलस्वराज्य आणि बाराव्या वित्त आयोगातील रक्कमेत मोठ्या प्रमाणात अपहार झाल्याचे एका ग्रामसभेमध्ये ग्रामस्थांनी उघड केल्यानंतर संबंधित दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल व्हावेत, अशी मागणी त्यावेळचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब जगताप यांच्याकडे करण्यात आली होती. त्यानंतर चौकशी समिती नेमण्यात आली. या समितीने आपला अहवाल सादर केला होता. यात जलस्वराज्य योजनेतील पाणीपट्टीच्या अनामत रक्कमा या कोणतेही स्वतंत्र खाते न उघडता अध्यक्ष व सचिव यांनी परस्पर खर्च केल्याचे नमूद करण्यात आले होते. कामे पूर्ण नसताना ठेकेदाराला बिले देण्यात आल्याचेही या तक्रारीत म्हटले होते. या योजनेत रक्कमेचा फार मोठ्या प्रमाणात अपहार झाल्याचे उघड झाले होते. यानंतर उजगावकर व सचिव कांचन कापडी यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केल्याने त्यांना ग्रामपंचायत सदस्य पदावरून अपात्र ठरवण्याचे आदेश कोकण आयुक्तांनी दिले.
अद्यापही या योजनेचे स्वतंत्र खाते अस्तित्त्वात नसून अपहार झालेल्या अनामत रक्कमेबाबत कोणताही खुलासा संबंधितांनी दिलेला नाही. सदस्यांची अनामत रक्कम या स्वतंत्र खात्यात जमा असणे गरजेचे असतानाही आजतागायत या लाखोंच्या रक्कमेचा पत्ता लागलेला नाही. योजनेची कामे ही निकृष्ट झाली आहेत. असे असताना केवळ अपात्रतेच्या कारवाईवरच ग्रामस्थांनी बोळवण केली गेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या योजनेच्या अंतिम हप्त्याची ९ लाख एवढी रक्कम ही अपहार उघड झाल्याने ती संबंधितांनी खर्च करु नये, असा ठराव ग्रामसभेमध्ये होऊनही सदरची रक्कम अध्यक्ष, सचिव आणि संबंधित अधिकारी यांनी ती ग्रामस्थांना विश्वासात न घेता परस्पर उपयोगात आणली. एवढा गंभीर भ्रष्टाचार असतानाही अध्यक्ष सचिवावर अपात्रतेची कारवाई करून यावर पडदा टाकल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. (वार्ताहर)
प्रकरणाची सखोल चौकशी हवी...
संगमेश्वर तालुक्यातील कडवई जलस्वराज्य भ्रष्टाचार प्रकरणाची पाळेमुळे खोलवर रूतली होती. झालेल्या चौकशीनंतर फौजदारी गुन्हा दाखल झाल्या नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.