राज्य उत्पादन शुल्क पथकाची कारवाई
By admin | Published: December 14, 2014 10:16 PM2014-12-14T22:16:29+5:302014-12-14T23:46:16+5:30
कोकणकन्या एक्स्प्रेसमधून गाडीचा वेग कमी होत असताना अज्ञात व्यक्तीने गोणत्यातून ६ बॅगा फेकून दिल्या
अडरे : कोकणकन्या एक्स्प्रेस या रेल्वे गाडीमधून अज्ञाताने गाडीचा वेग कमी होत असताना गोवा बनावटीच्या ६ बॅगा रुळाशेजारील झुडपामध्ये फेकून दिल्या. मात्र, उत्पादन शुल्काच्या पथकाने गोवा बनावटीची दारु जप्त केली. या दारुची अंदाजे किंमत १ लाख ८ हजार आहे. राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर विभागाच्या संगीता दरेकर यांच्या आदेशानुसार अधीक्षक संतोष झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग निरीक्षक उत्पादन शुल्क, चिपळूण पथकाने रात्री १२.३० वाजता गस्त घालत असताना वालोपे रेल्वे स्टेशनच्या मागील बाजूस कोकणकन्या एक्स्प्रेस गाडीमधून गाडीचा वेग कमी होत असताना अज्ञात व्यक्तीने गोणत्यातून ६ बॅगा खाली रुळाशेजारील झाडीझुडपात फेकून दिल्याचे या पथकाच्या निदर्शनास आले. त्या बॅगेमध्ये गोवा बनावटीच्या व्हीस्की ७५० मिलीच्या २४० बाटल्या (२० बॉक्स) जप्त करण्यात आल्या. एकूण मुद्देमाल १ लाख ८ हजारांची दारु जप्त केली. निरीक्षक किशोर वायंगणकर, उपनिरीक्षक शंकर यादव, गणेश गुरव, अतुल वसावे यांच्या पथकाने ही कारवाई केली. संबंधित व्यक्तीचा तपास पथक घेत आहे. (वार्ताहर)
चिपळुणातील घटना.
१ लाख ८ हजार रुपयांची गोवा बनावटीची दारु जप्त.
वालोपे रेल्वेस्टेशनच्या मागील बाजूस ६ बॅगा सापडल्या.
रेल्वेचा वेग कमी होत असताना अज्ञाताने मद्याच्या बाटल्या झाडीझुडूपात फेकून दिल्या.