आंगणेवाडी, कुणकेश्वर यात्रास्थळी गर्दी करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार : के. मंजुलक्ष्मी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 06:30 PM2021-03-04T18:30:31+5:302021-03-04T18:33:16+5:30
corona virus Sindhudurg-दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेली कुणकेश्वर यात्रा व नवसाला पावणारी भराडी देवीची यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने साजरी केली जाणार आहे. यात्रास्थळी गर्दी करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
ओरोस : दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेली कुणकेश्वर यात्रा व नवसाला पावणारी भराडी देवीची यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने साजरी केली जाणार आहे. या ठिकाणी केवळ देवस्थान कमिटीच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रम पार पाडले जाणार आहेत. त्यामुळे या यात्रास्थळी नागरिकांनी गर्दी करू नये. आपली जबाबदारी समजून आपल्या घरात राहून मानव सेवा हीच माधव सेवा हा धर्म पाळावा, असे आवाहन करतानाच यात्रास्थळी गर्दी करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी बोलत होत्या. या वेळी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे उपस्थित होते.
या वेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी म्हणाल्या की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात जत्रोत्सवांचा उत्सव सुरू आहे. त्यात पूर्ण राज्याचे लक्ष असलेली आणि नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असलेली आंगणेवाडीची भराठी देवीची जत्रा ६ फेब्रुवारी रोजी तर दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री देव कुणकेश्वरची यात्रा महाशिवरात्री अर्थात ११ फेब्रुवारी रोजी संपन्न होणार आहे. मात्र या दोन्ही जत्रास्थळी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने राज्यात वाढता कोरोनाचा धोका पाहता आंगणेवाडी आणि कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टशी जिल्हा प्रशासनाच्यावतीने बैठक घेत या यात्रा रद्द करण्याचे आवाहन करण्यात आले होते.
त्यानुसार दोन्ही देवस्थान कमिटींनी या यात्रा रद्द करत केवळ धार्मिक विधी करण्याचा निर्णय घेतला आहे. धार्मिक विधीदेखील काही निवडक मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहेत. मात्र, या यात्रास्थळी भाविक व अन्य नागरिकांना बंदी घालण्यात आली आहे. यात्रास्थळी जाणारे काही मार्ग सील करण्यात येत आहेत. दुकाने लावण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे या यात्रास्थळी नागरिकांनी गर्दी करू नये. आपली जबाबदारी समजून आपल्या घरात राहून मानव सेवा हीच माधव सेवा हा धर्म पाळावा, असे आवाहन केले आहे.
तसेच यात्रास्थळी गर्दी करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी यात्रास्थळी गर्दी होणार नाही यासाठी नियोजन करण्यात आले आहे. गर्दीमुळे जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार झाल्यास ते योग्य नाही यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने नियमांचे काटेकोर पालन केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.