कणकवली शहरातील रस्त्यालगतच्या अनधिकृत विक्रेत्यांवर होणार कारवाई

By सुधीर राणे | Published: July 14, 2023 04:08 PM2023-07-14T16:08:42+5:302023-07-14T16:09:08+5:30

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरील बैठकीत नोटिसीनंतर संयुक्त कारवाईच्या प्रांताधिकाऱ्यांच्या सूचना

Action will be taken against unauthorized street vendors in Kankavali city | कणकवली शहरातील रस्त्यालगतच्या अनधिकृत विक्रेत्यांवर होणार कारवाई

कणकवली शहरातील रस्त्यालगतच्या अनधिकृत विक्रेत्यांवर होणार कारवाई

googlenewsNext

कणकवली: कणकवली शहरातील महामार्ग उड्डाणपुलाखालील जागेत, सर्व्हिस रोडलगत तसेच मुख्य बाजारपेठेतील रस्त्यालगत अनधिकृतपणे भाजी, फळ, फुल विक्रेत्यांसह अन्य विक्रेते बसत आहेत. या विक्रेत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी कणकवली तालुका व्यापारी संघाने प्रांताधिकारी जगदीश कातकर यांच्याकडे केली. 

यावर विक्रेत्यांना बसण्यासाठी पर्यायी जागेची व्यवस्था करा व त्यांना त्याठिकाणाहून उठण्यासाठी नोटीस बजावून दोन दिवसांची मुदत द्यावी. त्यानंतरही विक्रेते पुन्हा त्याठिकाणी बसले तर त्यांच्यावर नगरपंचायत प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पोलिसांनी संयुक्तरित्या कारवाई करावी, अशी सूचना कातकर यांनी केली आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कणकवली तहसीलदार यांच्या दालनात शहरातील व्यापारी व अधिकारी यांच्यासमवेत जगदीश कातकर यांनी बैठक घेतली. या बैठकीला तहसीलदार आर.जे.पवार, मुख्याधिकारी अवधूत तावडे, सहायक पोलिस निरीक्षक एम. डी. पाटील, उपप्रादेशिक विभागाचे सहायक निरीक्षक अभिजीत शिरगावकर यांच्यासह विविध विभागाचे खातेप्रमुख व प्रतिनिधी उपस्थित होते.

कणकवली बाजारपेठेतील रस्त्यालगत अनेक विक्रेते अतिक्रमण करून व्यवसाय करीत आहेत. याचा परिणाम शहरातील व्यापाऱ्यांवर होतो आणि शहरात वारंवार वाहतूक कोंडी होते. ही बाब व्यापारी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी  प्रांताधिकारी कातकर यांच्या निदर्शनास आणली. याबाबत व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत गणेशोत्सवात उद्भवणाऱ्या समस्या लक्षात घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली. यावर प्रांताधिकारी कातकर यांनी विक्रेत्यांना त्या ठिकाणाहून उठण्यासंदर्भात संबंधित प्रशासनाने त्यांना पर्यायी जागेची व्यवस्था करून त्या जागेवरून उठवण्याबाबत दोन दिवसांची मुदत द्यावी तसेच उड्डाणपुलाखालील जागेत त्वरित बॅरिकेट्स लावावेत, अशा सूचना केल्या.

संजय मालंडकर यांनी शहरातील भाजीमार्केटचा प्रश्न मार्गी लावावा, अशी सूचना अवधूत तावडे यांना केली. रस्त्यालगत बसणाऱ्या भाजी, फळ, फुले व अन्य विक्रेत्यांना कुठे पर्यायी जागा देणे शक्य आहेत, याची माहिती तावडे यांनी दिली. उड्डाणपुलाखालील जागेत मोठ्या प्रमाणात अवजड वाहने असून ती हटविण्याबाबत निश्चित करण्यात आले. दरम्यान, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतुकीचे नियोजन करण्यासंदर्भात पुढील बैठक २ ऑगस्टला घेण्याचे ठरविण्यात आले.

Web Title: Action will be taken against unauthorized street vendors in Kankavali city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.