कामचुकारांवर कारवाई
By Admin | Published: October 20, 2015 09:26 PM2015-10-20T21:26:47+5:302015-10-20T23:50:08+5:30
शिक्षण समिती सभेत मागणी : शिक्षकांचे अप्रगत विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष
सिंधुदुर्गनगरी : देवगड तालुका वगळता जिल्ह्यात इतर ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळांमधून शिक्षक हे अप्रगत विद्यार्थ्यांचे जादा क्लासेस घेत नसल्याची बाब शिक्षण समिती सभेत उघड झाली. सदस्य विष्णू घाडी यांनी आक्रमक होत शिक्षक वेळेत शाळेत जात नसल्याने अप्रगत विद्यार्थ्यांना अतिरिक्त शिक्षण मिळत नसल्याचा आरोप केला. या मुद्याला शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी संजय बगळे यांनी दुजोरा देत कामचुकार शिक्षकांवर कारवाई झालीच पाहिजे असे स्पष्ट केले.
जिल्हा परिषदेची शिक्षण समितीची तहकूब सभा सभापती गुरुनाथ पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली येथील बॅ. नाथ पै समिती सभागृहात पार पडली. यावेळी समिती सदस्य विष्णू घाडी, सुषमा कोदे, संघटना प्रतिनिधी संजय बगळे, फादर लोबो, समिती सचिव आंगणे, अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते.शिक्षण सभापती गुरुनाथ पेडणेकर यांनी जिल्ह्यातील १४६७ जिल्हा परिषद शाळांमध्ये सन २०१५-१६ या शैक्षणिक वर्षात कोणकोणते उपक्रम राबविले जावेत याचे वार्षिक नियोजन केले होते व त्या वार्षिक नियोजन कार्यक्रमाचा आराखडा गटशिक्षण अधिकाऱ्यांमार्फत प्रत्येक शाळांना देण्यात आला होता. या कार्यक्रमाचा सभापती पेडणेकर यांनी आढावा घेतला. या आढाव्यामध्ये केवळ देवगड तालुक्यातील सर्व शाळांमध्ये अप्रगत विद्यार्थ्यांना शाळा सुरु होण्याच्या अगोदर व शाळा सुटल्यानंतर अर्धा तास शिक्षक अतिरिक्त वर्ग सुरु करून त्यांना प्रगत श्रेणीमध्ये आणण्यासाठी झटत आहेत. मात्र, हा तालुका वगळता जिल्ह्यात इतर सात तालुक्यात हा उपक्रम अद्यापही सुरु केला नसल्याचे पाहून सभापतींनी नाराजी व्यक्त केली. आक्रमक झालेल्या विष्णू घाडी यांनी कामचुकार शिक्षकांवर तोफ डागली. शिक्षक हे साडेदहा वाजले तरी शाळेमध्ये जात नाहीत. त्यामुळे अप्रगत विद्यार्थ्यांना शिक्षणाचे अतिरिक्त धडे मिळत नसल्याने जिल्हा मागे राहतोय. या मुद्याला संघटना प्रतिनिधी संजय बगळे यांनी दुजारा दिला. उपक्रम राबविण्यास कोणतेही शिक्षक टाळाटाळ करत असतील तर ते योग्य नाही. केंद्रप्रमुखांमार्फत या उपक्रमाचा आढावा घ्यावा व २५ आॅक्टोबरला याची सविस्तर माहिती सादर करावी, असे आदेश सभापती पेडणेकर यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले. (प्रतिनिधी)
ते अधिकार संस्थेला : सेमी इंग्रजीची अवस्था बिकट
तळवडे हायस्कूलमध्ये शालेय पोषण आहाराचा मर्यादेपेक्षा जास्त तांदुळसाठा आढळल्याप्रकरणी संबंधित मुख्याध्यापकाची विस्तार अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात आली होती. या चौकशीत तांदुळसाठा जास्त, नोंदीत तफावत, शालेय व्यवस्थापन समिती स्थापन न करणे आदी कारणांमुळे चौकशीत दोषी आढळलेल्या मुख्याध्यापकांवर कारवाई होणार असून ही कारवाई करण्याचे अधिकार नियमानुसार संस्थेला आहेत अशी माहिती माध्यमिक शिक्षण विभागामार्फत देण्यात आली.
जिल्ह्यात सुमारे ६०० शाळांमध्ये सेमी इंग्रजी सुरु करण्यात आले तर चालू वर्षी नव्याने एकाही सेमी इंग्रजी शाळेची मागणी नाही. मात्र सेमी इंग्रजी शिकविण्यासाठी तज्ज्ञ शिक्षक नसल्याने सुमारे ९० शाळांनी सेमी इंग्रजी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तर उर्वरित सुमारे ५१० शाळांमध्ये सेमी इंग्रजी सुरु असली तरी उपलब्ध शिक्षकांना प्रशिक्षण देऊन या शाळा केवळ चालविण्याचा खटाटोप शिक्षण विभागाकडून सुरु असल्याचे आजच्या सभेतील आढाव्यात स्पष्ट झाले. केवळ या शाळांमध्ये सेमी इंग्रजी सुरु असल्याचे सांगण्यात आले.