आडाळी एमआयडीसीची उर्वरित कामे गतीने पूर्ण करणार :सुभाष देसाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2020 02:15 PM2020-12-10T14:15:01+5:302020-12-10T14:17:28+5:30
Subhash Desai, Midc, Minister, Sindhudurgnews आडाळी एमआयडीसीच्या संथगतीने सुरू असलेल्या पायाभूत सुविधांच्या कामांबाबत संबंधित कंत्राटदाराला कडक समज देऊन आतापर्यंत झालेल्या कामांची चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी एमआयडीसीच्या मुख्य अभियंत्यांना दिले.
सिंधुदुर्ग : आडाळी एमआयडीसीच्या संथगतीने सुरू असलेल्या पायाभूत सुविधांच्या कामांबाबत संबंधित कंत्राटदाराला कडक समज देऊन आतापर्यंत झालेल्या कामांची चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी एमआयडीसीच्या मुख्य अभियंत्यांना दिले.
या प्रकल्पाच्या कार्यवाहीची आढावा बैठक घेऊन आपण स्वत: या कामांची पाहणी करून उर्वरित कामे गतीने पूर्ण करणार, असे आश्वासन त्यांनी ह्यघुंगुरकाठी-सिंधुदुर्गह्ण संस्थेच्या शिष्टमंडळाला दिले. कामे समाधानकारक होत नसतील ती संबंधित कंत्राटे रद्द करण्याचाही विचार करू, असे ते म्हणाले.
दोडामार्ग तालुक्यातील आडाळी एमआयडीसीच्या संथगतीने सुरू असलेल्या कामांबाबत ह्यघुंगुरकाठी-सिंधुदुर्गह्ण सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सतीश लळीत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने उद्योगमंत्री देसाई यांची मंत्रालयातील दालनात भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत देसाई बोलत होते.
या शिष्टमंडळात आडाळी एमआयडीसी स्थानिक लोकाधिकार संरक्षण समितीचे अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य पराग गावकर, सचिव व उद्योजक प्रवीण गावकर व सदस्य नारायण गावकर यांचा समावेश होता. संस्थेच्यावतीने देसाई यांना निवेदन देण्यात आहे.
सतीश लळीत म्हणाले की, आपल्या गावात होत असलेल्या या प्रकल्पाचे स्वागत करून ग्रामस्थांनी आपल्या जमिनी दिल्या, त्याला पाच वर्षे झाली. त्यानंतर गेल्यावर्षी अंतर्गत रस्ते, पाणीपुरवठा, धरण आदी कामांच्या निविदा प्रसिद्ध झाल्या. परंतु, ज्या कंत्राटदाराला हे काम मिळाले, त्याने स्वत: हे काम न करता अन्य एका ठेकेदाराकडे सोपविले. या ठेकेदाराकडे संबंधित कामासाठी लागणारी यंत्रसामग्री, मनुष्यबळ, अनुभव नसल्याचे आतापर्यंत अनेकदा दिलेल्या भेटीतून स्पष्ट झाले. यामुळे कामांची गती अत्यंत संथ राहिली आहे.
कामाचा आढावा घ्या
एमआयडीसीच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांनीही या कामाकडे अक्षम्य दुर्लक्ष केले. परिणामी अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबाबतीत प्रश्नचिन्ह निर्माण झाले. हजारो हातांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार देणाऱ्या या प्रकल्पाच्या कामाचा आढावा आपल्या स्तरावर घ्यावा, अशी विनंतीही लळीत यांनी केली.