शृंगारतळीत आदर्श ‘रॉयल’ घोटाळा
By Admin | Published: April 19, 2015 10:06 PM2015-04-19T22:06:54+5:302015-04-20T00:13:49+5:30
शासनाची फसवणूक : जुन्या इमारतीचा नकाशा जोडून बेकायदेशीर इमारतीचे खरेदीखत
गुहागर : शृंगारतळीतील महाराष्ट्र कन्स्ट्रक्शनकडून शासनाची झालेली फसवणूक समोर आली आहे. महाराष्ट्र कन्स्ट्रक्शन्समार्फत बांधण्यात आलेल्या रॉयल अपार्टमेंटमधील सांडपाणी प्रश्नामुळे हा मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. तहसीलदारांमार्फ त दंडात्मक कारवाईने कायम करण्यात आलेल्या पहिल्या इमारतीचा नकाशा जोडून बेकायदेशीर बांधलेल्या दुसऱ्या इमारतीमधील सदनिकांचे दुय्यम निबंधकांसमोर खरेदीखत करण्यात आली आहेत. येथील रहिवाशांनी आता ही बाब तहसीलदार वैशाली पाटील यांच्या निदर्शनास आणून दिल्यावर काय कारवाई होते यामध्ये गुहागरवासियांचे लक्ष लागले आहे.
पाटपन्हाळे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील शृंगारतळी येथील सर्वे नं. २८ (अ) हिस्सा नं. ४ पैकी १८ गुंठे क्षेत्रात रॉयल अपार्टमेंटचे बांधकाम करण्यात आले आहे. यामध्ये ‘ए’ विंग, ‘बी’ विकंग आणि ‘सी’ विंग अशा तीन इमारती बांधण्यात आल्या आहेत. पहिल्या ‘ए’ इमारतीच्या बांधकामानंतर तत्कालीन तहसीलदार जीवन कांबळे यांनी दंडात्मक कारवाई करुन २१ जुलै २०१२ रोजी बिनशेती परवानगी देण्यात आली आहे. या इमारतीमध्ये एकूण २४ निवासी सदनिका आहेत. या चोवीस सदनिकांसाठी २०७३५७१५ लांबी, रुंदी व उंचीची एकच एक शौचालयासाठीची टाकी बांधण्यात आलेली आहे. याच टाकीत इमारतीतील अन्य सांडपाणी व्यवस्थापन केलेले आहे. सन २०१३ मध्ये ‘ए’ इमारतीच्या सदनिकांचा ताबा खरेदीखताद्वारे देण्यात आला. पाठोपाठ २० सदनिका व १८ दुकान गाळ्यांची ‘बी’ इमारत बांधण्यात आली. त्यापैकी १४ सदनिकांची हातोहात विक्रीदेखील करण्यात आली आहे. मात्र या ‘बी’ विंग इमारतीला स्वतंत्र शौचालय टाकी बांधण्यात आलेली नाही. यानंतर बांधण्यात आलेल्या सी इमारतीसाठीदेखील विकासकांनी शौचालय टाकी बांधलेली नाही. १८ गुंठे जमिनीत तीन इमारती बांधल्या गेल्या. स्वतंत्र शौचालय टाकी नाही. मलमुत्र व सांडपाणी निस्सारणाचे योग्य नियोजन नाही. अशा परिस्थितीत स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनासह अन्य कोणत्याही संबंधित शासकीय प्रशासनाने लक्ष घालण्याची तसदी घेतलेली नाही. यातही आर्थिक उलाढाल कारणीभूत असल्याचे सांगण्यात येते पण खरा घोटाळा याहुनही मोठा आहे.
‘बी’ इमारतीतील १८ गाळे विकले गेलेले आहेत. ए इमारतीनंतर त्याच १८ गुंठे जमिनीला परवानगी मिळणार कुठून यावर उपाय म्हणून गुहागर दुय्यम निबंधकांसमोर ‘बी’ इमारतीमधील सदनिकांचे खरेदीखत करताना इमारतीचा नकाशा म्हणून २१ जुलै २०१२ रोजी तत्कालीन तहसीलदार जिवन कांबळे यांच्यासहिने मंजूर करण्यात आलेला ए इमारतीचा नकाशा जोडण्यात आला. चुकीच्या पद्धतीने व्यवहार होत असताना दुय्यम निबंधकांनी कोणत्या प्रकारे कागदपत्रांची पहाणी केली, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होते.
दोन्ही इमारतीमधील ४२ सदनिकांची आतापर्यंत विक्री झाली आहे. तिसऱ्या इमारतीच्या वरच्या मजल्यावर महाराष्ट्र कन्स्ट्रक्शनचे मालक महमद हसनमिया कारभारी यांचे कुुटुंब राहते. अशा प्रकारे या सर्व सदनिकांमधील मलनिस्सारणासाठी एकच शौचालय टाकी असल्याने ती वारंवार भरुन वाहते. त्यामुळे परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. सदनिकाधारकांनी ग्रामपंचायत, पंचायत समिती स्तरावर वारंवार याबाबत आवाज उठवला. मात्र ग्रामपंचायतीचे कारभारी यांना कायम पाठीशी घातले. वारंवार होत असलेल्या या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी येथील सदनिकाधारकांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत अखेर महाराष्ट्र कन्स्ट्रक्शनच्या गैरव्यवहाराचा पर्दाफाश केला. गुहागरच्या तहसीलदार वैशाली पाटील यांना या गैरव्यवहाराचे पुरावे त्यांनी सादर केले आहेत. त्यामुळे आता काय कारवाई होते याकडे साऱ्यांचे लक्ष आहे. पत्रकार परिषदेत इमरान रफीक घारे, जी. एस. क्षीरसागर, सुरेंद्र रामा जाक्कर, व्ही. एस. कदम, तलहा मुकादम, निळकंठ नारायण पावसकर, मुजफ्फर मुकादम, अशपाक कुपे आदी सदनिकाधारक उपस्थित होते. या सदनिकाधारकांमध्ये मोठ्या प्रमाणात सरकारी अधिकारी, कर्मचारी, व्यापारी, शिक्षकांचा समावेश आहे. (वार्ताहर)
ही बाब अतिशय गंभीर असून माहिती मिळताच पाटपन्हाळे मंडळ अधिकारी व्ही. एम. यादव यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. आज रविवार सुट्टी असून सोमवारी याबाबतचा सविस्तर अहवाल प्राप्त होईल. त्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल.
- वैशाली पाटील,
तहसीलदार, गुहागर.
शृंगारतळीतील महाराष्ट्र कन्स्ट्रक्शनकडून शासनाची फसवणूक
सांडपाणी प्रश्नामुळे घोटाळा उघडकीस
सदनिकाधारकांनी केला पर्दाफाश
व्यापारी, कर्मचारी सदनिकाधारक
१८ गुंठ्यात तीन इमारती
खरेदीखतातही घोटाळा
शृंगारतळीतील अनधिकृत बांधकामे रडारवर