आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा
By admin | Published: September 1, 2015 09:25 PM2015-09-01T21:25:01+5:302015-09-01T21:25:01+5:30
संदेश सावंत : शिक्षकदिनी वितरण, सतरा प्रस्तावांमधून आठ जणांची निवड
सिंधुदुर्गनगरी : प्राथमिक शाळांतील शिक्षकांना दरवर्षी देण्यात येणारे आठ आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाले असून ५ सप्टेंबर रोजी येथील जिल्हा नियोजन सभागृहात या पुरस्कारांचे वितरण होणार असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांनी दिली.आदर्श शिक्षण पुरस्कारासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे तालुकास्तरावरून १७ प्रस्ताव प्राप्त झाले होते. यामध्ये वैभववाडी तालुक्यातून २, मालवण २, कुडाळ ३, वेंगुर्ले २, सावंतवाडी १, दोडामार्ग २, कणकवली ३, देवगड २ असे प्रस्ताव प्राप्त झाले होते. या प्रस्तावांवर सविस्तर चर्चा होऊन निकषात बसणारे आठ प्रस्तावांची निवड करून ते मंजुरीसाठी कोकण विभागाच्या आयुक्त कार्यालयाकडे २१ आॅगस्ट रोजी सादर करण्यात आले होते. यातील आठही तालुक्यातील प्रत्येकी एका प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे.दरवर्षी जिल्हा परिषदेमार्फत आदर्श शिक्षक निवडले जातात. त्यासाठी प्राथमिक शाळांमधील प्रत्येक तालुक्याचे प्रस्ताव मागविले जातात. त्या प्रस्तावांची छाननी करून प्रत्येक तालुक्यातून एक असे एकूण आठ प्रस्ताव कोकण विभागीय आयुक्त कार्यालयाकडे मंजुरीसाठी आठ सदस्यीय समितीमार्फत पाठविले जातात. सन २०१५ च्या पुरस्कारांना मान्यता मिळाली असून शिक्षकदिनी म्हणजेच ५ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी भवनातील जिल्हा नियोजन सभागृहात या पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे. ५०० रुपये, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप राहणार असून शिक्षकांच्या पत्नीची ओटीही भरण्यात येणार आहे, अशी माहिती संदेश सावंत यांनी दिली. यावेळी शिक्षण सभापती गुरुनाथ पेडणेकर, समाजकल्याण सभापती अंकुश जाधव, प्राथमिक शिक्षणाधिकारी रत्नाकर धाकोरकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
...हे आहेत मानकरी
संदेश सावंत यांनी मंगळवारी आदर्श शिक्षकांची नावे जाहीर केली. यामध्ये वैभववाडी तालुक्यातून बाळासाहेब श्रीधर कोलते (उपशिक्षक-विद्यामंदिर आचिर्णे), मालवण तालुक्यातून कल्पना अशोक परब (उच्चश्रेणी मुख्याध्यापक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेंडूर संयुक्त मोगरणे), कुडाळ तालुक्यातून उदय रमाकांत गोसावी (पदवीधर शिक्षक - जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा वालावल पूर्व), वेंगुर्ले तालुक्यातून दत्तगुरु सदानंद कांबळी (पदवीधर शिक्षक, दाभोली नं. १ शाळा), सावंतवाडी तालुक्यातून महेश विष्णू पालव (पदवीधर शिक्षक, जिल्हा परिषद शाळा कास नं. १), दोडामार्ग तालुक्यातून जयसिंग बळीराम खानोलकर (पदवीधर शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साटेली भेडशी), कणकवली तालुक्यातून कृष्णा पंढरी सावंत (पदवीधर शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगवे), देवगड तालुक्यातून धर्मराज पांडुरंग धुरत (पदवीधर शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इळये नं. १) यांचा समावेश आहे.