विकासाच्या वाटा धुंडाळणारे आदर्श गाव
By Admin | Published: December 31, 2016 09:46 PM2016-12-31T21:46:13+5:302016-12-31T21:46:13+5:30
हडीची ग्रामगाथा जिल्ह्यासाठी प्रेरणादायी : पर्यावरणपूरक योजना, आधुनिकतेची जोड, पर्यटन या त्रिसूत्रीची सांगड
सिद्धेश आचरेकर --मालवण
तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यासह राज्यात हडी गावने विकासाच्या दृष्टीने आदर्शवत व नियोजनबद्ध कार्यशैलीने वेगळा ठसा उमटविला आहे. ग्रामपंचायत स्तरावरून राबविण्यात येणाऱ्या सर्व योजना व उपक्रम हे लोकसहभागातून साकार केले जातात. गावातील प्रत्येक नागरिक नवनव्या संकल्पनांना प्रतिसाद देत असल्याने सर्व योजना यशस्वीपणे राबविल्या जातात. पर्यावरणपूरक योजना, आधुनिकतेची जोड आणि पर्यटन या त्रिसूत्रीची सांगड घालत विकासाच्या दिशेने झेप घेणाऱ्या हडी गावाने वेगळी ओळख निर्माण केली. नववर्षात हडी गाव हा जिल्ह्यात आदर्शवत असा आहे.
हडी गावाला तीन बाजूंनी गडनदी खाडीपात्राने व्यापले आहे. मालवण-आचरा मार्गावर मध्यवर्ती असे हे आदर्श ग्राम वसले आहे. प्रस्तावित सी-वर्ल्डही येथून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर आहे.
हडी गावचे उपक्रमशील सरपंच महेश मांजरेकर यांच्या नेतृत्त्वाखाली गाव प्रगतीपथावर आहे. गावातील मूलभूत, पायाभूत सुविधा सोडविण्याबरोबरच भविष्यात उपयोगी ठरणाऱ्या योजनांची व्यापक दूरदृष्टी ठेवून आपल्या सहकारी सदस्य व ग्रामस्थांना सोबत घेऊन नियोजन करणे, ही सरपंच मांजरेकर यांची कार्यपद्धत आहे. त्यामुळेच आज हडी गाव जिल्ह्याच्या नकाशावर झळकताना एक आदर्श ग्राम म्हणून नावारूपाला येत आहे. दस्तरखुद्द तत्कालीन पर्यटन व गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनीही हडी गावचे कौतुक करताना विकासासाठी आवश्यक निधी देण्याचे मान्य केले होते.
गावाच्या तीन बाजूनी खाडी आहे. त्यामुळे ५० वषार्हून येथील गाळ उपसा न झाल्याने क्षारयुक्त पाण्याच्या समस्येबरोबर उन्हाळ्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागत होते. यावर मांजरेकर यांनी खारभूमी विकासच्या सहकायार्ने खाड्यातील गाळ उपसा करून गावात जास्तीत जास्त चर, खड्डे मारून पावसाचे नैसर्गिक पाणी अडवून पाण्याच्या पातळीत वाढ केली. त्यामुळे क्षारयुक्त पाण्याचे प्रमाण ब?्यापैकी कमी झाले असून गावात पाणी टंचाईची वेळ येत नाही, हे विशेष.
याशिवाय युवकांना व्यायामशाळा, महिलांसाठी काथ्या व्यवसाय प्रशिक्षण, मत्स्य पालन, कोलंबी संवर्धन, केज कल्चर (पिंज?्यातील मत्स्यपालन) आदी रोजगार विषयक उपक्रम राबविताना महिला सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न आहे. एकंदरीत मालवण तालुक्यातील हडी या गावाचा आदर्श जिल्ह्यातील इतर गावांनी घ्यावा आणि ग्रामसमृद्धी साधावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
पर्यटनात कात टाकेल!
प्रस्तावित सी वर्ल्ड प्रकल्पापासून दीड किमी अंतरावर असलेल्या हडी गावची निवड राज्य शासनाने ग्रामीण पर्यटन गाव योजनेत केली आहे. गडनदी खाडीपात्राचा पर्यटनासाठी उपयोग करुन पर्यटकांसाठी सुसज्ज असे ठिकाण निर्माण केले जाणार आहे. ४ किमी लाभलेल्या खाडीक्षेत्रात खारभूमी बंधारा बांधून पर्यटनाचे नवे दालन तयार करून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे. ग्रामीण पर्यटन अंतर्गत ४० लाखाची निविदा प्रकिया मंजूर झाली आहे. यात रस्ते, पाणी, वीज यासह खाडीतील मनुष्यवस्ती असलेली दोन बेटे विकसित केली जाणार आहेत. त्यामुळे भविष्यत हडी गावही पर्यटनात कात टाकेल, असा विश्वास सरपंच महेश मांजरेकर यांनी व्यक्त केला.
डिजीटल इंडियाची कास : गावाची सोलर ग्रामच्या दिशेने वाटचाल : महेश मांजरेकर
हडी गावाने विकासासाठी डिजिटल इंडियाची कास धरली आहे. गावातील प्राथमिक शाळा नं. १ ही गावकर-देवधर ट्रस्टच्या माध्यमातून डिजिटल करण्यात आली असून ब्लॉग असलेली जिल्ह्यातील एकमेव शाळा आहे. तर शाळा नं. २ ही लवकरच डिजिटल होणार असून सद्यस्थितीत विद्यार्थ्यांना संगणकाच्या साह्याने शाळेत प्राथमिक ज्ञान दिले जात आहे.
हडी ग्रामपंचायतीच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ग्रामपंचायत कार्यालयात 'ई-वाचनालय'ची मोफत सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कॅशलेस संकल्पना हडी गावात राबविण्याचा मानस असून व्यापारी, ग्रामस्थ, दुकानदार यांच्या जनजागृती करून सवार्ना विश्वासात घेऊन कॅशलेस व्यवहार करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
तसेच गावात डिजिटल ग्राम धर्तीवर ओएफसी केबलद्वारे ५०० मीटरपर्यंत 'वायफाय' देण्याची कार्यवाही सुरु असल्याची माहिती सरपंच महेश मांजरेकर यांनी दिली. गावात पर्यावरणपूरक योजना राबविल्या जातात. येथील जैवविविधता, कांदळवने संवर्धन केले जाते. गेल्या तीन वषार्पासून वीजेची बचत म्हणून सौरऊर्जेच्या शक्तीने गाव प्रकाशमान होऊ लागला आहे.
आताच्या घडीला २५ कुटुंबानी 'सोलर होम लाईट' बसविले असून यातील दहा कुटुंबात पूर्णत: सौरऊजेर्चा वापर केला जातो. १५० कुटुंबाकडे सौर कंदील आहे. तर गतवर्षी गावातील नादुरुस्त व टाकाऊ स्थितीतील सौर पॅनलचा वापर करून भारतातील पहिल्या सोलर ग्रापंचायतीचा बहुमान हडीने मिळविला. याचे उदघाटन मंत्री राम शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले होते.