पिकांचे चक्र वर्षाऋतूशी जोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2016 11:02 PM2016-01-19T23:02:52+5:302016-01-19T23:38:17+5:30

राजेंद्रसिंह : जलपुरूषाचा रत्नागिरीत जलचेतना मार्गदर्शन मेळावा

Add the crop cycle to the rainy season | पिकांचे चक्र वर्षाऋतूशी जोडा

पिकांचे चक्र वर्षाऋतूशी जोडा

Next

रत्नागिरी : प्रत्येक ठिकाणी उद्योग उभारण्याची आवश्यकता नाही, शिवाय नद्या जोडून कोणताही विकास साध्य होणार नाही, त्याऐवजी देशातील लोक एकमेकांशी जोडले जाणे आवश्यक आहे. शेती अथवा पिकांचे चक्र वर्षाऋतूच्या चक्राशी जोडण्याची आवश्यकता आहे, अशी माहिती रॅमन मॅगसेसे व जलक्षेत्रातील नोबेल पुरस्कार विजेते जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी, कोकण भूमी प्रतिष्ठान, हिरवळ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने गोगटे - जोगळेकर महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात आयोजित जलचेतना मार्गदर्शन मेळाव्यापूर्वी डॉ. राजेंद्रसिंह यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
डॉ. राजेंद्रसिंह यांनी पर्यावरण रक्षणासाठी लढा सुरू केला आहे. विशेषत: पाणी वाचविण्यासाठी त्यांनी मोहीम सुरू केली आहे. जलचेतना मेळाव्याच्या निमित्ताने ते रत्नागिरी दौऱ्यावर आले आहेत. पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, भारत सर्वाधिक तरूणवर्गाचा देश आहे. मात्र, ऐन तारूण्यात येथील नद्या प्रदूषित झाल्या आहेत. भविष्यातील पिढीसाठी संपत्ती नाही तर जीवन महत्त्वाचे आहे. या नद्या पुनरूज्जीवित न झाल्यास पुढील पिढी आपला अवमान करण्यास मागे पुढे पाहणार नाही, असेही सिंह यांनी सांगितले.
कोकण हा निसर्गाचा सुपुत्र आहे, त्यामुळेच याठिकाणी भरपूर पर्जन्यवृष्टी होते. भरमसाठ जंगलतोडीमुळे सह्याद्री भकास होत चालला आहे. डोंगरदऱ्यात वसलेल्या कोकणातील पाणी नद्यांद्वारे समुद्राला जावून मिळते. हे पाणी अडवण्याची आवश्यकता आहे. नद्यांमधील गाळ उपसून तेथील प्रदूषण थोपवले पाहिजे. नद्या पुनरूज्जीवित झाल्या की, आपोआप विहिरींच्या पाण्याची पातळी वाढणार आहे. स्वातंत्र्यानंतर मोठ्या प्रमाणात धरणे बांधण्यात आली.
शासनाने पाण्यासाठी सर्वाधिक पैसा खर्च केला, तरीही पाण्याविना आत्महत्या करणाऱ्यांची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक असल्याची खंत डॉ. राजेंद्रसिंह यांनी व्यक्त केली.
हिरवळ वाढण्यासाठी मातीची आवश्यकता आहे. नद्यांमधील गाळ उपसा केल्यावर पाणी साचेल. पाण्याच्या बाष्पीभवनामुळे पाण्याचे ढग तयार होतील, शिवाय पर्जन्यवृष्टी चांगली होईल. शिवारे डोलू लागतील, सृष्टीचे नंदनवन होईल. राजस्थानमध्ये हा प्रयोग यशस्वी झाला आहे, तर कोकणात का होणार नाही. त्यासाठी समस्त युवावर्गाने जलसाक्षरता चळवळ मोठ्या प्रमाणावर उभारण्याची आवश्यकता आहे. उपलब्ध पाण्याच्या थेंबन्थेंबाचा वापर उत्तमरित्या होणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे डॉ. राजेंद्रसिंह यांनी सांगितले. (प्रतिनिधी)


पावसाचे प्रमाण अधिक : पाणी अडविण्याची गरज
कोकणात मोठ्या प्रमाणात पावसाचे प्रमाण आहे. मात्र, तरीही पाणीटंचाईची झळ सोसावी लागते. डोंगर माथ्यावर पडणारे पाणी थेट समुद्राला जाऊन मिळते. त्यामुळे हे पाणी अडविणे गरजेचे आहे. हे पाणी अडविल्यास पाणीटंचाईची झळ कमी प्रमाणात पोहचू शकते. त्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत.


बंधारे मोहीम
रत्नागिरी जिल्ह्यात पाणीटंचाईची पोहोचणारी झळ कमी करण्यासाठी ‘मिशन बंधारे’ ही मोहीम राबविली जात आहे. त्याद्वारे नदी, वहाळ याठिकाणी वनराई, विजय बंधारे बांधण्यात येत आहेत. यामुळे पाणी अडविण्यास मदत होत असून, जिल्ह्यात ही मोहीम सुरू आहे.



प्रत्येक ठिकाणी उद्योग उभारण्याची गरज नाही.
नद्या जोडून कोणताही विकास साध्य होणार नाही.
भारत सर्वाधिक तरूणवर्गाचा देश आहे.
कोकणातील पाणी नद्यांद्वारे समुद्राला मिळते.

Web Title: Add the crop cycle to the rainy season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.