दाणोलीला-सासोली मार्ग जोडा; दोडामार्ग भाजपची मागणी
By admin | Published: March 24, 2015 09:10 PM2015-03-24T21:10:13+5:302015-03-25T00:47:03+5:30
हा प्रस्तावित मार्ग दाणोली, विलवडे, तांबोळी, असनिये, झोळंबे, तळकट, कुंब्रल, कुडासे, सासोली मार्गे दोडामार्ग व गोवा राज्याला जोडता येण्यासारखा आहे.
कसई दोडामार्ग : महाराष्ट्र शासनाने नवीन सह्याद्री राज्यमार्ग क्र. १९० प्रस्तावित केला आहे. त्यात दोडामार्गचा समावेश नाही, तसेच सह्याद्री पट्ट्याचाही समावेश होत नाही. त्यामुळे हा प्रस्तावित मार्ग दाणोली-विलवडे ते कुंब्रल-कुडासे-सासोली येथे जोडावा, अशी मागणी भाजपाचे तालुकाध्यक्ष रंगनाथ गवस यांनी सहकारण, पणन, सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, सह्याद्री मार्ग क्र. १९० मंजूर केला आहे. जिल्ह्यातून तो कणकवली तालुक्यातील कनेडी मार्ग मालवण- कुडाळ-सावंतवाडी तालुक्यातून कलंबिस्त-सांगेली, विलवडे मार्गे बांदा असा प्रस्तावित आहे. मात्र, बांद्यातून राष्ट्रीय महामार्ग क्र. ११७ या प्रस्तावित मार्गाने जात आहे. त्यामुळे नवीन रस्त्याची आवश्यकता नाही. त्यामुळे हा प्रस्तावित मार्ग दाणोली, विलवडे, तांबोळी, असनिये, झोळंबे, तळकट, कुंब्रल, कुडासे, सासोली मार्गे दोडामार्ग व गोवा राज्याला जोडता येण्यासारखा आहे. त्यामुळे हा भाग विकास प्रक्रि येत येणार असून दुर्गम भागांचा विकास होणार आहे. हा मार्ग पूर्णपणे सह्याद्री पट्ट्यात येतो. खऱ्या अर्थाने हा मार्ग असा झाला, तर सह्याद्री पट्ट्याचे महत्त्व वाढवून पर्यटनासाठी नवे दालन उघणार आहे. त्यामुळे या मार्गाचे सर्वेक्षण करून प्रस्ताव सादर करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम खात्याला द्यावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. (वार्ताहर)