खारेपाटण येथे अतिरिक्त भूसंपादन, चौदा जमीनधारकांना नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 04:45 PM2020-06-25T16:45:57+5:302020-06-25T16:49:21+5:30

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ च्या चौपदरीकरणाचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. सर्व्हिस रस्त्यासह गटारलाईन व छोटी-मोठी कामे महामार्ग प्राधिकरणच्यावतीने जिल्ह्यात सर्वत्र सुरू आहेत. मुंबई-गोवा महामार्गासाठी खारेपाटण येथे पूर्वी संपादित केलेली जमीन सर्व्हिस रस्त्यासह इतर कामांसाठी आता कमी पडू लागल्याने नव्याने पुन्हा एकदा येथील सुमारे १४ जमीनधारकांना अतिरिक्त भूसंपादन करण्यासंदर्भात लेखी नोटिसा प्राप्त झाल्या आहेत.

Additional land acquisition at Kharepatan, notice to 14 landowners | खारेपाटण येथे अतिरिक्त भूसंपादन, चौदा जमीनधारकांना नोटिसा

खारेपाटण येथे अतिरिक्त भूसंपादन, चौदा जमीनधारकांना नोटिसा

googlenewsNext
ठळक मुद्देखारेपाटण येथे अतिरिक्त भूसंपादन, चौदा जमीनधारकांना नोटिसा महामार्गासाठी यापूर्वी संपादित केलेली जमीन कमी पडू लागली

खारेपाटण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ च्या चौपदरीकरणाचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. सर्व्हिस रस्त्यासह गटारलाईन व छोटी-मोठी कामे महामार्ग प्राधिकरणच्यावतीने जिल्ह्यात सर्वत्र सुरू आहेत. मुंबई-गोवा महामार्गासाठी खारेपाटण येथे पूर्वी संपादित केलेली जमीन सर्व्हिस रस्त्यासह इतर कामांसाठी आता कमी पडू लागल्याने नव्याने पुन्हा एकदा येथील सुमारे १४ जमीनधारकांना अतिरिक्त भूसंपादन करण्यासंदर्भात लेखी नोटिसा प्राप्त झाल्या आहेत.

कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग रत्नागिरी, सहाय्यक अभियंता श्रेणी १ राष्ट्रीय महामार्ग उपविभाग खारेपाटण आणि प्रांताधिकारी कार्यालय कणकवली यांच्याकडून या नोटिसा प्राप्त झाल्या असून अतिरिक्त भूसंपादनासाठी प्रत्यक्ष मोजणी करण्याची कार्यवाही २३ जूनपासून सुरू करण्यात आली आहे. यामुळे खारेपाटणमधील ग्रामस्थांची घरे, दुकाने व सरकारी कार्यालये यात बाधित होऊन तुटण्याची शक्यता आहे.

खारेपाटण येथे महामार्गावरील वरचे स्टॅँड येथील सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालय ते खारेपाटण पूल तपासणी नाक्यापर्यंत सुमारे अर्धा किलोमीटरपर्यंतचा भाग यात बाधित होणार आहे. आता नव्याने बनविलेल्या महामार्गापासून सुमारे अर्धा किलोमीटर लांब व १५ मीटर रुंद अतिरिक्त जागा भूसंपादन कार्यालयाच्यावतीने मुंबई-गोवा महामार्गासाठी संपादित करण्यात येणार आहे.

७३आर/१२ चौरस मीटर इतके भूसंपादन क्षेत्र अतिरिक्त म्हणून घेण्यात येणार आहे. यामुळे सध्या खारेपाटण येथे मुंबई-गोवा महामार्गाला लागून असलेली घरे व दुकान गाळे तसेच सरकारी कार्यालये, फळे देणारी झाडे यात बाधित होण्याची दाट शक्यता आहे.

कणकवली येथील भूमी अभिलेख उपअधीक्षक कार्यालयाच्यावतीने उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशाने खारेपाटण येथे करण्यात येत असलेल्या अतिरिक्त भूसंपादन मोजणीवेळी कनिष्ठ अभियंता नम्रता पाटील, केसीसी बिल्डकॉन कंपनीचे पांडे, खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत, भूकरमापक सत्यवान बोहलेकर व जमीनधारक उपस्थित होते.

खारेपाटण येथील महामार्गावरील सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयापासून जमीन मोजण्यास सुरुवात करण्यात आली असून खारेपाटण तपासणी नाका पुलापर्यंत या जमीन मोजणीचे काम ३ दिवसांत करण्यात येणार आहे. त्याचे योग्य ते मूल्यांकन करून अतिरिक्त भूसंपादनात बाधित झालेली घरे, जमिनी, झाडे, गाळे यांना त्यांची नुकसान भरपाई शासनाच्यावतीने देण्यात येणार आहे. तसा अहवाल सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालय खारेपाटण व भूमी अभिलेख कार्यालयाच्यावतीने महामार्ग प्राधिकरण व प्रांत कार्यालयाला देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

खारेपाटण येथील महामार्गासाठी आवश्यक असणारी जमीन शासनाच्यावतीने संपादित केली असून मुख्य मार्ग सोडून सर्व्हिस रस्त्यालाही जागा देण्यात आली आहे. असे असताना अतिरिक्त भूसंपादन करण्याची गरज काय? असा प्रश्न ग्रामस्थांमधून विचारला जात आहे. तर भूसंपादनात बाधित झालेल्या ग्रामस्थांना त्यांच्या नुकसानीची भरपाई शासन तातडीने देणार का? असे प्रश्न या निमित्ताने नागरिकांमधून उपस्थित होत आहेत.

५०० मीटर लांबीचे होणार भूसंपादन

मुंबई-गोवा महामार्गावरील खारेपाटण येथील सुमारे ५०० मीटर लांबीचा तर १५ मीटर रुंदीचा जमिनीचा भाग अतिरिक्त भूसंपादन करण्यात येणार आहे. खारेपाटण येथील करण्यात येत असलेले अतिरिक्त भूसंपादन हे मुंबई-गोवा महामार्गाला लागून सर्व्हिस रस्ता बनविण्यासाठी होत आहे. खारेपाटण रोड रेल्वे स्टेशन चिंचवली हे भविष्यात लवकरच सुरू होण्याची दाट शक्यता आहे.

नोटीस बजावण्यात आलेले जमीनधारक

राजमती ब्रह्मदंडे व इतर ५९, प्रभाकर चराटे, प्रफुल्ल ब्रह्मदंडे व इतर ५८, प्रशांत आलते व इतर ३, चंद्रकात आलते व इतर ४, तुकाराम चिमाजी उर्फ बाबुराव राऊत व इतर ४०, चंद्रकांत आलते व इतर ३७, रवींद्र रायबागकर व इतर ३, चंद्रकांत रायबागकर व इतर ५, सरिता झगडे इतर ३, ग्रामपंचायत खारेपाटण, सदानंद देवस्थळी, वासुदेव राऊत.

खारेपाटण रेल्वे स्टेशनला जाणारा हा स्वतंत्र रस्ता मुंबई-गोवा महामार्ग खारेपाटणला लागून बनविण्यात येणार असून आताच्या खारेपाटण येथील बॉक्सवेल सर्व्हिस रस्त्यापर्यंत तो जोडण्यात येणार असल्याचे समजते. खारेपाटण रेल्वे स्टेशन सुरू झाल्यास महामार्गावर खारेपाटण येथे वाहनांची वर्दळ वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे खारेपाटण सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालय ते खारेपाटण पूल चिंचवली रस्त्यापर्यंतची सुमारे अर्धा किलोमीटर लांबीची जमीन नव्याने भूसंपादित करण्यात येत असल्याचे समजते.
 

Web Title: Additional land acquisition at Kharepatan, notice to 14 landowners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.