आडेली तलाव दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर

By admin | Published: April 6, 2016 09:58 PM2016-04-06T21:58:49+5:302016-04-06T23:43:57+5:30

निधीचा अभाव : प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; गळतीमुळे पाणी जातेय वाया; जीर्ण नळांना झाडांच्या मुळांचा धोका रामचंद्र कुडाळकर -- तळवडे

Adeli lake repair question on the anecdote | आडेली तलाव दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर

आडेली तलाव दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर

Next

आडेलीतील लघुपाटबंधारे विभागामार्फत उभारण्यात आलेल्या तलावाची दुरवस्था झाली असून, तलावाच्या डागडुजीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तलावाच्या धरणाचे दरवाजे, पाणीपुरवठा नळ जीर्ण झाले असून, यातून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. तलाव दुरुस्तीच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या आहेत. पाणी उपलब्ध असून केवळ नियोजनाअभावी तलावातच साचून आहे. एकीकडे दुष्काळाची झळ बसत असताना आडेली तलावात पाणी असूनही त्याचे नियोजनबद्ध वाटप होत नसल्याने प्रशासनाच्या या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
वेंगुर्ले तालुक्याला पाणी टंचाईची समस्या दरवर्षीचीच असते. या टंचाईवर मात करण्यासाठी आडेली येथे पाणीसाठा करणाऱ्या तलावाची उणीव भासत होती. याठिकाणी एखादा तलाव निर्माण झाला तर तलावात पावसाचे पाणी साठून राहीलच; शिवाय अडविलेले पाणी जमिनीत जिरूही शकेल. नेमकी हीच गरज ओळखून आडेलीतील शेतकऱ्यांची पाण्याची सोय करण्यासाठी लघू पाटबंधारे विभागाने आडेली परिसरात पाहणी करून येथे तलाव उभारण्यासाठी हालचाली सुरू केल्या. १९७३ साली या धरणासाठी प्रथम प्रशासकीय रक्कम ९ लाख ५८ हजार रुपये मंजूर झाले होते; पण नंतर सुधारित रक्कम १२ लाख ७५ हजार रुपये मंजूर झाले आणि त्यातून तलाव दृष्टिपथात येऊ लागला. १९७७ साली तलावाची प्रत्यक्षात उभारणी करण्यात आली. या तलावात ०.५३ दशलक्ष घनमीटर पाणीसाठ्याची क्षमता निर्माण करण्यात आली. शिवाय या प्रकल्पाची सिंचन क्षमताही १३४.०० हेक्टरची आहे. हा तलाव केवळ शेतकऱ्यांसाठी उभारण्यात येऊन या पाण्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेती प्रेरणा मिळावी, हा हेतू ठेवण्यात आला होता. त्याची सुरुवातही चांगली झाली; पण
१५ वर्षानंतर या तलावाचे मजबुतीकरण करणे गरजेचे बनले. त्यामुळे धरणाच्या मजबुतीकरणाचे काम हाती घेतले. हे काम १९९५ साली पूर्ण झाले.
तलावामध्ये पाणीसाठा होत राहिला; पण सिमित क्षेत्रातच पाणी पुरवठा सुरू राहिला; पण या तलावाच्या दुरुस्तीकडचे दुर्लक्ष मात्र कायम राहिले. या तलावाच्या धरणाचे लोखंडी गेट, पाईपलाईन, दरवाजे यांची दरुस्ती करणे सध्या गरजेचे आहे. तलावाच्या ठिकाणी भूअंतर्गत पाईपलाईन आहे.
त्या पाईपलाईनमधील जॉर्इंटना गळती असल्यामुळे या परिसरात दलदल निर्माण झाली आहे. तर भविष्यात या गळतीच्या ठिकाणातून झाडाची मुळे पाईपलाईनमध्ये शिरून नळ चॉकअप होण्याची शक्यता आहे. तरीही संबंधित विभागाने तलाव दुरुस्तीत कधीच गांभीर्य दाखविले नाही. जर असेच दुर्लक्ष राहिले, तर भविष्यात हा तलाव ‘पाणी उशासी तहान घशासी’ अशा अवस्थेत येऊन केवळ तलाव शोभेपुरताच मर्यादीत राहील.


परिसरातील शेतकऱ्यांना शेतीसाठी मुबलक पाणीसाठा आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी हव्या त्या प्रमाणात मिळू शकते. सध्या या तलावाच्या धरणाची दुरवस्था झाली आहे. यासाठी पाच लाखांच्या आसपास निधी लागेल; पण विभागाकडे तो नसल्याने कोंडी झाली आहे. यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. आगामी काळात लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी यांच्या माध्यमातून हा निधी मिळविण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत.
स्रेहल माईणकर
सहायक अभियंता, लघुपाटबंधारे विभाग.

सिंचन क्षमता १३४ :- प्रत्यक्षात १५ हेक्टरच
या धरणाची लांबी, रुंदी पाहता या धरणात मुबलक पाणीसाठा होऊन वर्षभर पाण्याची सोय होऊ शकतो. या प्रकल्पाची सिंचन क्षमता १३४.०० हेक्टर आहे; पण प्रत्यक्षात मात्र १५ ते २० हेक्टरच्या दरम्यानचे क्षेत्र सिंचनाखाली येते. या धरणाच्या पाण्याखाली गतवर्षी १६.८५ हेक्टर सिंचनाखाली तर २०१५-१६ हे क्षेत्र १५ हेक्टरपर्यंत प्रस्तावित ठेवले होते.


ग्रामस्थांचे आंदोलन बेदखल
या धरणाची डागडुजी व्हावी, याकरिता तळवडे जिल्हा परिषदेंच्या सदस्या निकिता परब, आडेलीचे सरपंच भरत धर्णे, आपा धुरी, शिवराम धुरी, गंगाधर गोवेकर, बाळा जाधव यांच्यासह आडेलीतील असंख्य शेतकरी व सामाजिक कार्यकर्त्यांनी या धरणाच्या डागडुजीसाठी उठाव केला; पण त्यांच्या मागणीला प्रशासनाने बेदखल केले आहे.

Web Title: Adeli lake repair question on the anecdote

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.