मुंबईतील मराठी शाळा बंद करण्याचा आदित्य ठाकरेंचा डाव, मंत्री दीपक केसरकरांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2022 12:40 PM2022-12-06T12:40:59+5:302022-12-06T12:46:30+5:30
मर्यादा तुटल्या तर संयमाचा बांध फुटु शकतो. उद्धव ठाकरे यांच्या बद्दल आदर असल्यामुळे आम्ही गप्प आहोत.
सावंतवाडी : उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदावर डोळा ठेवून बाळासाहेबांच्या विचारांची प्रतारणा केली असल्याची टीका शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी मुंबईमधील मराठी माणसाला संपविण्याचा प्रयत्न करणाऱ्या आदित्य ठाकरे यांनी मराठी शाळा बंद करून इंग्लिश शाळांना परवानगी दिली असा आरोप ही मंत्री केसरकर यांनी केली.
आदित्य ठाकरे यांच्या टिकेचा समाचार घेतना केसरकर म्हणाले बाळासाहेबांचे विचार संपवण्याचे काम या मंडळींनी केले असून काँग्रेस व राष्ट्रवादीशी हात मिळवणी करून ते सिद्ध केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयात जात नव्हते तसेच आदित्य ठाकरे देखील मंत्रालयात येत नव्हते असे सांगतानाच मुख्यमंत्र्यांचा रिमोट कंट्रोल हा राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे होता.
तेच मंत्रालय सांभाळत होते. हे दुर्देव होते आणि बाळासाहेबांचे विचार संपविण्याचे काम काँग्रेस व राष्ट्रवादी करत असताना आम्ही ४० आमदारांनी बाळासाहेबांचे विचार राखण्यासाठीच स्वतंत्रपणे निर्णय घेतला असे ते म्हणाले. बाळासाहेबांनी ३७० कलम रद्द करण्याची भूमिका मांडली होती. तोच निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला असे मंत्री केसरकर यांनी सांगितले.
तर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यापूर्वीच शिवसेनेला उपमुख्यमंत्री पद देण्याचे निश्चित केले होते पण त्यानी ते स्वीकारले नाही. आदित्य ठाकरे शिवसैनिकांची दिशाभूल करत आहेत. आमच्या ५० आमदारांच्या संयमाला मर्यादा आहेत. या मर्यादा तुटल्या तर संयमाचा बांध फुटु शकतो. उद्धव ठाकरे यांच्या बद्दल आदर असल्यामुळे आम्ही गप्प आहोत. मात्र आदीत्य ठाकरे आता मर्यादांचा बाण सुटत चालला आहे, असे केसरकर यांनी सांगितले.
जनता योग्यवेळी कौल दाखवून देईल
मुंबईतील मराठी शाळा बंद करून इंग्रजी शाळा सुरू करण्याचे काम या मंडळींनी केले आदित्य ठाकरेंनी इंग्रजी शाळा सुरू करण्यासाठी लोटांगण घातले. मुंबईतील मराठी कार्यालय हलवण्यासाठी ठाकरे यांनी पुढाकार घेतला. बाळासाहेबांच्या विचारांची बांधिलकी संपली फक्त मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर लक्ष ठेवून ते काम करत असल्याची टीका देखील मंत्री केसरकर यांनी केली. ते म्हणाले, प्रेमाने जग जिंकता येते महाराष्ट्रात लोकांच्या जनमताचा अपमान करून काँग्रेस व राष्ट्रवादीशी आघाडी केली खरे तर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना व भाजपाला मतदारांनी कौल दिला होता.पण कोणी जनतेच्या मताचा अनादर केला ते जनता योग्य वेळी दाखवून देईल असे ही मंत्री केसरकर म्हणाले.